monsoon-update-maharashtra-no-monsoon-till-10-june-cmo-appeal-farmers-weather-alert : १० जूनपर्यंत महाराष्ट्रात मान्सूनची शक्यता नाही
Mumbai : राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची आणि काहीशी चिंताजनक माहिती समोर आली आहे. राज्यात काही भागांमध्ये वादळी पावसाची शक्यता असली तरी त्याचा मान्सूनशी कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाने याबाबत अधिकृत माहिती देत शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, असे आवाहन केले आहे. सध्याच्या परिस्थितीनुसार महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये किमान १० जूनपर्यंत मान्सून दाखल होण्याची शक्यता नसल्याचे सांगण्यात आले आहे.
राज्यात जून महिन्याच्या सुरुवातीपासून हवामानात बदल होण्यास सुरुवात झाली आहे. विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, खानदेश तसेच कोकणातील काही भागांमध्ये दुपारनंतर ढगाळ वातावरण निर्माण होऊन मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या बदलामुळे तापमानात काही प्रमाणात घट होण्याची अपेक्षा असली तरी पूर्व विदर्भातील काही भागांमध्ये उष्णतेचा प्रभाव कायम राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
St bus facility : एसटीचे सर्व स्वच्छतागृह आता मोफत; प्रवाशांना मिळणार स्वच्छ सुखद प्रवास !
मुख्यमंत्री कार्यालयाने सामाज माध्यमांद्वारे दिलेल्या माहितीनुसार, राज्यात पडणारा संभाव्य वादळी पाऊस हा मान्सूनपूर्व स्वरूपाचा आहे. नैऋत्य मोसमी वारे अद्याप केरळपर्यंत पूर्णपणे पोहोचलेले नसल्यामुळे महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन लांबण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी या पावसावर विसंबून पेरणी सुरू करू नये आणि स्थिर तसेच समाधानकारक पावसाची खात्री झाल्यानंतरच पेरणीचे नियोजन करावे, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
कृषी विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन विभागानेही शेतकरी व नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. विशेषतः विजांच्या कडकडाटाच्या वेळी झाडाखाली, टिनशेडखाली किंवा वीज खांब, ट्रान्सफॉर्मर आणि विद्युत वाहिन्यांच्या जवळ उभे राहणे टाळावे. शेतकऱ्यांनी स्वतःच्या तसेच पाळीव जनावरांच्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी, असे प्रशासनाने म्हटले आहे.
दरम्यान, देशभरातील हवामानात मोठे बदल दिसून येत आहेत. भारतीय हवामान विभागाने देशातील १७ राज्यांसाठी वादळी पाऊस, मेघगर्जना आणि सोसाट्याच्या वाऱ्यांचा इशारा जारी केला आहे. काही भागांमध्ये ताशी ७० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. ईशान्य भारत आणि दक्षिणेकडील काही राज्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा अंदाज असून अनेक भागांमध्ये हवामान अस्थिर राहण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रासह पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात, पश्चिम बंगाल, सिक्कीम, ओडिशा, बिहार, झारखंड, जम्मू-काश्मीर आणि इतर काही राज्यांमध्ये अवकाळी पाऊस व गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
उत्तर प्रदेशमध्ये अलीकडील मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे अनेक ठिकाणी मोठे नुकसान झाले असून जीवितहानीच्या घटनाही घडल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळावे आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
Bjp candidates : रेवती सुळे यांचे होणारे सासरे अरुण लखानीं, प्राजक्त तनपुरेंनाही उमेदवारी !
भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, नैऋत्य मोसमी वाऱ्यांची प्रगती सुरू असून पुढील तीन ते चार दिवसांत ते आग्नेय अरबी समुद्र, लक्षद्वीप, केरळ, तामिळनाडूचा काही भाग आणि बंगालच्या उपसागरातील विस्तृत क्षेत्रात पुढे सरकण्यासाठी परिस्थिती अनुकूल राहणार आहे. मात्र महाराष्ट्रात मान्सूनच्या प्रत्यक्ष आगमनासाठी आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.
यामुळे खरीप हंगामाच्या तयारीत असलेल्या शेतकऱ्यांनी संयम बाळगून हवामान विभागाच्या अधिकृत अंदाजावर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. पेरणीसाठी घाईगडबडीत निर्णय न घेता स्थिर पावसाची खात्री झाल्यानंतरच पुढील नियोजन करावे, असा सल्ला कृषी तज्ज्ञांकडूनही दिला जात आहे.








