व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Rain alert : राज्यातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा अलर्ट, पुढील ४८ तास...

Rain alert : राज्यातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा अलर्ट, पुढील ४८ तास निर्णायक !

maharashtra-rain-alert-heavy-rain-yellow-alert-monsoon-update-next-48-hours : हवामान विभागाचा मोठा इशारा, वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता

Mumbai : दीर्घ प्रतीक्षेनंतर नैऋत्य मान्सूनने महाराष्ट्रात अधिकृत प्रवेश केला असून राज्यातील हवामानात मोठा बदल झाला आहे. कोकण किनारपट्टीमार्गे राज्यात दाखल झालेल्या मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी अनुकूल वातावरण तयार झाले असून भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांसाठी पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. पुढील ४८ तास राज्यासाठी महत्त्वाचे मानले जात असून काही भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा आणि पुणे जिल्ह्यांमध्ये पुढील चार ते पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोकण आणि घाटमाथ्यावरील भागांमध्ये काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता असल्याने प्रशासन आणि नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, राज्यातील तब्बल २५ जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला असून अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

विदर्भातही हवामानात लक्षणीय बदल होण्याची शक्यता आहे. अकोला जिल्ह्यासाठी पुढील चार दिवस यलो अलर्ट जारी करण्यात आला असून ६ जून ते ९ जून दरम्यान विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज आहे. काही भागांत ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात. गेल्या काही दिवसांपासून तीव्र उष्णतेचा सामना करणाऱ्या नागरिकांना यामुळे दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

Rohit pawar : सरसकट कर्जमाफीसाठी रोहित पवारांचा एल्गार

मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्येही ढगाळ वातावरणासह वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. परभणी जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी पावसाने जोरदार हजेरी लावली. पूर्णा शहरासह आसपासच्या भागात झालेल्या पावसामुळे बाजारपेठेत खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची तारांबळ उडाली. अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळाले.

सोलापूर जिल्ह्यातील करमाळा, देवळाली आणि रोशेवाडी परिसरात वादळी वाऱ्यांचा मोठा फटका बसला. काही घरांवरील पत्रे उडून गेली तर देवळाली येथे एका घरावरील पत्रे उडाल्यानंतर दगड खाली पडून दोन महिला किरकोळ जखमी झाल्या. वादळी वाऱ्यामुळे काही प्रमाणात मालमत्तेचे नुकसान झाल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने दिली आहे.

सांगली जिल्ह्यातही मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली आहे. गेल्या दोन दिवसांपासून शहरासह परिसरात सकाळी उकाडा आणि सायंकाळी वादळी पाऊस असे चित्र पाहायला मिळत आहे. विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यांसह झालेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार, मान्सूनची प्रगती समाधानकारक असून येत्या काही दिवसांत तो राज्याच्या आणखी भागांमध्ये सक्रिय होणार आहे. १५ जूनपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र मान्सूनच्या प्रभावाखाली येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून खरीप हंगामाच्या पेरणीसाठी पोषक परिस्थिती तयार होण्याची अपेक्षा आहे.

Rohit pawar : सरसकट कर्जमाफीसाठी रोहित पवारांचा एल्गार

दरम्यान, पुढील काही दिवस राज्यातील अनेक भागांमध्ये मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वादळी वारे आणि मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज असल्याने नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, अनावश्यक प्रवास टाळावा आणि हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. राज्यात मान्सून सक्रिय होत असल्याने पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

error: Content is protected !!