व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Sharad pawar : मोदी-नेहरू तुलना अशक्य; स्वातंत्र्यलढ्यातील योगदान विसरता येणार नाही

Sharad pawar : मोदी-नेहरू तुलना अशक्य; स्वातंत्र्यलढ्यातील योगदान विसरता येणार नाही

sharad-pawar-targets-bjp-says-comparison-between-narendra-modi-and-jawaharlal-nehru-is-impossible : शरद पवारांचा पंतप्रधानपदाचा सन्मान राखणे आवश्यक म्हणत भाजपवर निशाणा

Mumbai : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या २७ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका केली. पंतप्रधानपदाचा सन्मान राखणे आवश्यक असले तरी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील पंडित जवाहरलाल नेहरू यांचे योगदान, त्यांचा संघर्ष आणि देशाच्या जडणघडणीत असलेली भूमिका लक्षात घेतली तर नरेंद्र मोदी आणि नेहरू यांची तुलना होऊ शकत नाही, असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले.

मुंबईत पार पडलेल्या वर्धापन दिन कार्यक्रमात पक्षाचे खासदार, आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रीय कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, ज्येष्ठ नेते जयंत पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड, माजी मंत्री अनिल देशमुख, आमदार रोहित पवार, माजी खासदार फौजिया खान, महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांच्यासह अनेक नेत्यांची उपस्थिती यावेळी होती.

कार्यक्रमात बोलताना शरद पवार यांनी देशासमोरील बेरोजगारी, आदिवासी समाजाच्या समस्या, महिलांचे प्रश्न आणि अल्पसंख्याकांशी संबंधित मुद्द्यांकडे लक्ष वेधले. देशात अनेक गंभीर प्रश्न असताना सत्ताधारी नेतृत्व त्याकडे अपेक्षित गांभीर्याने पाहत नसल्याचा आरोप त्यांनी केला. काहीजण नरेंद्र मोदी यांना देशातील सर्वोत्तम नेता म्हणून सादर करत असून त्यांची तुलना पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याशी करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र नेहरू यांचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान, त्याग आणि राष्ट्रनिर्मितीतील भूमिका लक्षात घेतली तर अशी तुलना योग्य ठरत नाही, असे त्यांनी सांगितले.

Sambhaji Brigade : ‘शेतकरी वाचवा, कर्जमाफी द्या’; नांदुऱ्यात अर्धनग्न आंदोलन

पवार म्हणाले की, नरेंद्र मोदी यांना दीर्घकाळ पंतप्रधान म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे आणि त्यांच्या समर्थकांना त्यांचा कार्यकाळ आणखी वाढावा असे वाटणे स्वाभाविक आहे. मात्र पंडित नेहरू यांच्या राजकीय कारकिर्दीची पार्श्वभूमी वेगळी होती. स्वातंत्र्यपूर्व काळात त्यांनी अनेक वर्षे तुरुंगवास भोगला, ब्रिटिशांविरोधात संघर्ष केला आणि स्वतंत्र भारताच्या उभारणीत महत्त्वाची भूमिका निभावली. त्यामुळे त्यांच्या योगदानाकडे दुर्लक्ष करून इतिहासाचे पुनर्लेखन करता येणार नाही, असे त्यांनी नमूद केले.

देशाच्या आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठेबाबत बोलताना शरद पवार यांनी पंडित जवाहरलाल नेहरू आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या कार्याचा विशेष उल्लेख केला. या दोन्ही नेत्यांनी भारताची जागतिक स्तरावर ओळख मजबूत केली. तसेच गांधी कुटुंबाने देशासाठी केलेला त्यागदेखील विसरता येणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित करताना शरद पवार यांनी संघटनात्मक बळकटीसाठी रस्त्यावर उतरून काम करण्याचे आवाहन केले. आगामी काळात जनतेच्या प्रश्नांवर अधिक आक्रमकपणे लढा देण्याची गरज असल्याचे सांगत त्यांनी कार्यकर्त्यांना संघटन विस्तारासाठी सज्ज राहण्याचे निर्देश दिले.

यावेळी शरद पवार यांनी अप्रत्यक्षपणे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस गटालाही टोला लगावला. एका राजकीय पक्षाने दिलेल्या जाहिरातीचा संदर्भ देत त्यांनी प्रसिद्धीपेक्षा जनतेतील विश्वास अधिक महत्त्वाचा असल्याचे म्हटले. सत्ता असो किंवा नसो, जनतेशी संपर्क कायम ठेवून काम करण्याची पक्षाची परंपरा असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

Sanjay Gaikwad, Vijayraj shinde : गायकवाड-शिंदे संघर्ष न्यायालयात; १०० कोटींचा मानहानीचा दावा

दरम्यान, ‘मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले’ या दूरचित्रवाणी मालिकेबाबतही कार्यक्रमात चर्चा झाली. खासदार आणि अभिनेते अमोल कोल्हे यांनी मालिकेला आर्थिक अडचणी निर्माण केल्या जात असल्याचा मुद्दा उपस्थित केला. समाजप्रबोधन आणि पुरोगामी विचारांचा प्रसार करणारी ही मालिका कोणत्याही परिस्थितीत बंद पडू नये, अशी भूमिका व्यक्त करण्यात आली. यासाठी आमदार रोहित पवार यांनी ५० लाख रुपये तर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी १० लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिन कार्यक्रमात शरद पवार यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका करताना पक्ष संघटन मजबूत करण्याचा संदेश दिला. त्याचबरोबर नेहरूंच्या ऐतिहासिक योगदानाचा पुनरुच्चार करत भाजपकडून होत असलेल्या तुलनात्मक राजकारणावरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

error: Content is protected !!