operation-tiger-shivsena-uddhav-thackeray-plan-b-ready-amid-mpdefection-speculation : खासदार फुटीच्या शक्यतेत उद्धव ठाकरेंचा प्लॅन बी तयार, मातोश्रीवर संघटन बांधणीला वेग
Mumbai : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा ‘ऑपरेशन टायगर’ची जोरदार चर्चा सुरू झाली असून, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील काही खासदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या संपर्कात असल्याच्या चर्चांमुळे राजकीय वातावरण तापले आहे. आगामी काळात पक्षातील काही खासदार फुटू शकतात, अशा चर्चांना वेग आला असतानाच उद्धव ठाकरे यांनी संघटनात्मक पातळीवर नुकसान नियंत्रणासाठी हालचाली सुरू केल्याची माहिती समोर येत आहे.
गेल्या काही महिन्यांपासून ‘ऑपरेशन टायगर’बाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होती. मात्र अलीकडेच मातोश्रीवर आयोजित करण्यात आलेल्या बैठकीला ठाकरे गटाच्या नऊपैकी पाच खासदारांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली. या घडामोडीनंतर पक्षांतर्गत अस्वस्थता वाढल्याचे बोलले जात असून, संभाव्य फुटीच्या पार्श्वभूमीवर पक्ष नेतृत्वाने कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी थेट संवाद वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, काही खासदार पक्ष सोडण्याच्या चर्चांमुळे उद्धव ठाकरे यांनी आता ‘प्लॅन बी’वर काम सुरू केले आहे. खासदारांनी वेगळी भूमिका घेतली तरी पक्षाची संघटनात्मक ताकद कायम ठेवणे, कार्यकर्त्यांचा विश्वास अबाधित राखणे आणि स्थानिक पातळीवरील नेतृत्व अधिक मजबूत करणे, यावर सध्या भर दिला जात आहे. त्यामुळे जिल्हाप्रमुख, विभागप्रमुख, शाखाप्रमुख आणि पदाधिकाऱ्यांशी सातत्याने संपर्क साधण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचे सांगितले जात आहे.
Sudhir Mungatiwar : विक्रमवीर मुनगंटीवार करणार विधानसभेत दमदार बॅटिंग
मातोश्रीवर नुकत्याच झालेल्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केल्याची माहिती आहे. सर्व खासदार पक्षासोबत असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच खासदार फुटीच्या चर्चांमुळे कार्यकर्त्यांमध्ये निर्माण होणारा संभ्रम दूर करण्यासाठी स्थानिक स्तरावर संवाद वाढवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
विशेषतः ज्या मतदारसंघांतील खासदारांबाबत पक्षांतराच्या चर्चा सुरू आहेत, त्या भागांतील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना पक्ष एकसंघ असल्याचा संदेश देण्याचे काम सुरू आहे. संभाव्य राजकीय घडामोडींमुळे संघटन ढासळू नये, यासाठी पक्षाकडून विविध बैठका आणि संवाद सत्रांचे आयोजन केले जात आहे.
ईशान्य मुंबईतील पक्ष पदाधिकाऱ्यांच्या बैठकीतही उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना आश्वस्त करण्याचा प्रयत्न केल्याचे समजते. संबंधित खासदार पक्षासोबतच असल्याचे स्पष्ट करत अफवांना बळी पडू नये, असा संदेश देण्यात आला. याशिवाय बैठकीस गैरहजर राहिलेल्या खासदारांना त्यांच्या अनुपस्थितीबाबत कार्यकर्त्यांसमोर स्पष्टीकरण देण्याच्या सूचना देण्यात आल्याचेही बोलले जात आहे.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडून पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त मोठ्या शक्तिप्रदर्शनाची तयारी सुरू करण्यात आली आहे. मुंबईतील गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये होणाऱ्या कार्यक्रमासाठी राज्यभरातील पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या कार्यक्रमात विविध स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडून आलेल्या सदस्यांचा सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
मात्र या सर्व तयारीदरम्यान राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू ‘ऑपरेशन टायगर’ हाच ठरला आहे. शिंदे गटाच्या वर्धापन दिनी ठाकरे गटातील काही खासदार प्रवेश करणार का, याबाबत विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. यासंदर्भात कोणतीही अधिकृत घोषणा नसली तरी राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
दुसरीकडे, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या ६० व्या वर्धापन दिनाची तयारीही जोरात सुरू आहे. मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात हा कार्यक्रम पार पडणार असून, पक्षातील सर्व प्रमुख नेते आणि लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार असल्याचे सांगितले जात आहे. या कार्यक्रमात उद्धव ठाकरे सध्याच्या राजकीय परिस्थितीवर, खासदार फुटीच्या चर्चांवर आणि आगामी राजकीय रणनीतीवर काय भूमिका मांडतात, याकडे राज्यातील राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.
विशेष म्हणजे, वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला ठाकरे गटाचे सर्व नऊ खासदार उपस्थित राहतात की नाही, यावरूनही पक्षातील एकजूट आणि भविष्यातील राजकीय समीकरणांबाबत अनेक संकेत मिळू शकतात. त्यामुळे येत्या काही दिवसांतील घडामोडी महाराष्ट्राच्या राजकारणासाठी महत्त्वाच्या ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
___








