Rumours spread about Food and Civil Supplies Department officials arriving for enforcement action : कारवाईच्या भीतीने व्यापाऱ्यांची पळापळ; दोन तास शुकशुकाट, नंतर अफवा ठरली फोल
Dongaon अन्न व पुरवठा विभागाचे अधिकारी कारवाईसाठी डोणगावात येत असल्याच्या एका अफवेने संपूर्ण बाजारपेठेत एकच खळबळ उडाली. कारवाईच्या भीतीने व्यापाऱ्यांनी घाईघाईने दुकाने बंद केल्याने काही वेळातच गजबजलेल्या बाजारपेठेत शुकशुकाट पसरल्याचे चित्र पाहायला मिळाले.
मिळालेल्या माहितीनुसार, अन्न व पुरवठा विभागाचे पथक अचानक तपासणी आणि छापेमारीसाठी गावात दाखल होत असल्याची चर्चा बाजारात सुरू झाली. ही माहिती वाऱ्यासारखी पसरताच अनेक व्यापाऱ्यांनी सावध भूमिका घेत दुकाने बंद करण्यास सुरुवात केली. काही ठिकाणी ग्राहकांना दुकानाबाहेर काढून तातडीने शटर डाऊन करण्यात आल्याचेही दिसून आले.
हॉटेल व्यावसायिक, किराणा दुकानदार, मेडिकल स्टोअर्स, पानटपरी चालक तसेच इतर लहान-मोठ्या व्यावसायिकांनी संभाव्य कारवाई आणि दंडाच्या भीतीने प्रतिष्ठाने बंद केली. परिणामी, नेहमी गर्दीने फुलून गेलेला मुख्य बाजार रस्ता काही क्षणांतच ओस पडला. अचानक निर्माण झालेल्या या परिस्थितीमुळे नागरिक आणि खरेदीसाठी आलेले ग्राहकही संभ्रमात पडले.
Water crisis : ‘कर आम्ही भरतो, पाणी कुठे जाते?’ मलकापुरात शिवसैनिकांचा प्रशासनाला जाब
दरम्यान, तास-दोन तास उलटल्यानंतरही गावात कोणतेही पथक किंवा अधिकारी दाखल झाले नाहीत. काही व्यापाऱ्यांनी संबंधित विभागाशी संपर्क साधून खात्री केली असता, कोणतीही अधिकृत तपासणी किंवा कारवाई नियोजित नसल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर ही केवळ अफवा असल्याचे समोर आले.
या प्रकारामुळे बाजारात खरेदीसाठी आलेल्या ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. अनेकांना जीवनावश्यक वस्तू न मिळाल्याने रिकाम्या हाताने परत जावे लागले. अफवेच्या भरवशावर दुकाने बंद केल्याने व्यापाऱ्यांचेही आर्थिक नुकसान झाल्याची चर्चा गावभर सुरू आहे.








