Prakash Ambedkar criticises Congress, remarks that the Mahavikas Aghadi has effectively ceased to exist : पंतप्रधान मोदींना रोखण्याची हिंमत राष्ट्रीय स्वयंसेवक संघातही (RSS) नसल्याचा दावा
Nagpur विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस आणि महाविकास आघाडीवर जोरदार हल्ला चढवला. आम्ही भाजपच्या विरोधात शेवटपर्यंत लढतो, मात्र तुमच्या उमेदवारांनी मैदान सोडून पळ काढला, तर काही नावालाच उभे राहिले, असा थेट आरोप त्यांनी केला. नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी काँग्रेसचे उमेदवार निवडणुकीत लढलेच नाहीत आणि महाविकास आघाडीचे विसर्जन झाले असल्याचे सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधत ते म्हणाले की, पंतप्रधानांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवणारे विषय सार्वजनिक झाले आहेत. थेट नाव न घेता ‘एपस्टिन फाईल’चा उल्लेख करत आंबेडकर यांनी दावा केला की, याच फाईलमुळे अमेरिकेसोबत करार करण्यात आला असून, त्यामुळे भारतातील अन्नधान्याची बाजारपेठ त्यांच्यासाठी खुली झाली आहे. या करारामुळे देशातील शेतकरी आणि इतर नागरिकांना गुलामगिरीत ढकलण्यात आले असून, भविष्यात भारतीय शेतकरी पूर्णपणे कोलमडला जाईल. अमेरिकेसारख्या श्रीमंत शेतकऱ्यांसोबत गरीब भारतीय शेतकरी कसा काय स्पर्धा करणार, असा प्रश्न उपस्थित करत मोदींना रोखण्याची हिंमत राष्ट्रीय स्वयंसेवक संघातही (RSS) नसल्याचा दावा त्यांनी केला.
गेल्या १२ वर्षांपासून केंद्रात भाजपची सत्ता आहे, मात्र त्यांच्याकडे या देशाच्या आर्थिक प्रगतीसाठी कुठलीच उपाययोजना नाही. मुस्लिम विरोध हा एकमेव धार्मिक अजेंडा ते राबवत आहेत, अशी टीका करत “धर्म तुम्हाला मनशांती देईल, मात्र त्याने पोट भरत नाही,” असा टोलाही त्यांनी लगावला. भाजपचे धोरण, अमेरिकेसोबतचा करार आणि खासदार-लोकप्रतिनिधींची केली जात असलेली खरेदी यावरून भारताची वाटचाल गुलामगिरीकडे सुरू झाली आहे, असा आरोप त्यांनी केला. या विरोधात आवाज उठवण्याची ताकद फक्त आंबेडकरी चळवळीतच असून आम्ही आमच्या परीने लोकजागृती करत आहोत, विरोधकांनीसुद्धा यात सहभागी व्हावे, असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी केले.








