व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home देश-विदेश America iran war : ‘इराणचे अस्तित्व मिटवून टाकू’; ट्रम्प यांचा थेट इशारा,...

America iran war : ‘इराणचे अस्तित्व मिटवून टाकू’; ट्रम्प यांचा थेट इशारा, होर्मुझजवळ भीषण हवाई हल्ले

 

america-iran-war-hormuz-strait-us-airstrikes-trump-warning-latest : दोन आठवड्यांतच शांतता करार कोलमडला

New Delhi : पश्चिम आशियात पुन्हा एकदा युद्धाचे ढग गडद झाले असून, अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्षाने धोकादायक वळण घेतले आहे. अवघ्या दोन आठवड्यांपूर्वी झालेला शांतता करार मोडीत निघाल्यानंतर दोन्ही देशांमध्ये पुन्हा एकदा थेट लष्करी कारवाया सुरू झाल्या आहेत. होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ व्यापारी आणि तेलवाहू जहाजांवर झालेल्या ड्रोन हल्ल्यांनंतर अमेरिकेने इराणच्या लष्करी तळांवर आणि किनारपट्टीवरील संरक्षण यंत्रणांवर सलग दुसऱ्या दिवशी भीषण हवाई हल्ले केले. या कारवाईनंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला थेट अस्तित्व संपवून टाकण्याची धमकी दिल्याने जागतिक पातळीवर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

जगातील सर्वात महत्त्वाच्या सागरी व्यापारी मार्गांपैकी एक मानल्या जाणाऱ्या होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जगातील मोठ्या प्रमाणावर कच्च्या तेलाची वाहतूक केली जाते. त्यामुळे या भागातील कोणताही लष्करी संघर्ष जागतिक अर्थव्यवस्था आणि तेल बाजारावर थेट परिणाम करणारा मानला जातो. अशा परिस्थितीत या सामुद्रधुनीत पुन्हा युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने अनेक देशांनी चिंता व्यक्त केली आहे.

Tet paper leak : ‘गुरुजींचाही पेपर फुटला!’ ‘नीट’नंतर आता महाटीईटी प्रश्नपत्रिका लीक

अमेरिका आणि इराण यांच्यात नुकताच तणाव कमी करण्यासाठी सामंजस्य करार झाला होता. मात्र, हा करार फार काळ टिकू शकला नाही. गुरुवारी एका मालवाहू जहाजावर झालेल्या हल्ल्यानंतर शनिवारी होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ पनामाचा ध्वज असलेल्या ‘एमटी किकू’ या तेलवाहू जहाजावर आत्मघातकी ड्रोन हल्ला करण्यात आला. या जहाजात सुमारे २० लाख बॅरलहून अधिक कच्चे तेल असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेनंतर अमेरिकेने तातडीने लष्करी कारवाईचा निर्णय घेतला.

अमेरिकन सेंट्रल कमांडच्या माहितीनुसार, इराणला शांतता कराराचे पालन करण्याची संधी देण्यात आली होती. मात्र, त्यांनी व्यापारी जहाजांवर हल्ले सुरूच ठेवल्याने राष्ट्राध्यक्षांच्या आदेशानुसार इराणमधील क्षेपणास्त्र तळ, ड्रोन साठवणूक केंद्रे आणि किनारपट्टीवरील रडार यंत्रणांवर अचूक हवाई हल्ले करण्यात आले. इराणी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण इराणमधील सिरिक बेट आणि केश्म बेट परिसरात मोठमोठे स्फोट झाल्याचे वृत्त समोर आले आहे.

Nagpur municipal corporation: नगरसेवकांना २५ लाख फंड, नागपूर शहराचा पर्यटन स्थळ म्हणून विकास

हवाई हल्ल्यानंतर काही मिनिटांतच राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर आक्रमक भूमिका मांडत इराणला गंभीर परिणामांची चेतावणी दिली. इराणने पुन्हा एकदा शांतता कराराचे उल्लंघन केल्याचा आरोप करत अमेरिकेने ही कारवाई केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच आवश्यक वाटल्यास अमेरिकेची लष्करी मोहीम अधिक तीव्र केली जाईल आणि अशा परिस्थितीत इराणचे अस्तित्वच धोक्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे. डी. व्हान्स यांनीदेखील इराणवर कठोर शब्दांत टीका केली. करारानुसार मतभेद चर्चेतून सोडविण्याची संधी उपलब्ध असतानाही इराणने हिंसक मार्ग स्वीकारल्याचा आरोप त्यांनी केला. हिंसेला योग्य प्रत्युत्तर दिले जाईल, असा स्पष्ट इशारा देत अमेरिकेने आपल्या लष्करी भूमिकेचा पुनरुच्चार केला.

दुसरीकडे, इराणनेही अमेरिकेच्या कारवाईचा तीव्र निषेध करत प्रत्युत्तर देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सने या भागातील अमेरिकेच्या काही लष्करी तळांना लक्ष्य केल्याचा दावा केला आहे. अमेरिकेच्या कोणत्या तळांना फटका बसला आणि त्याचे नेमके नुकसान किती झाले, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, इराणने अमेरिकेला ‘जशास तसे’ उत्तर देण्याचा इशारा दिल्याने संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Uddhav Thackeray: हिंमत असेल तर राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढा, उद्धव ठाकरेंचे आव्हान

या नव्या संघर्षामुळे जागतिक तेल बाजार, समुद्री व्यापार आणि पश्चिम आशियातील सुरक्षा परिस्थिती पुन्हा एकदा धोक्यात आली आहे. विशेषतः होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणाऱ्या तेल वाहतुकीवर परिणाम झाल्यास त्याचे पडसाद जगभरातील इंधन दरांवर उमटू शकतात. अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढत्या तणावामुळे आता आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष पुन्हा पश्चिम आशियाकडे लागले असून, हा संघर्ष आणखी व्यापक स्वरूप धारण करणार का, याबाबत जगभरात चिंता व्यक्त केली जात आहे.

__

error: Content is protected !!