ashadhi-wari-2026-government-grants-rs-20000-to-1400-honoured-dindis : मानाच्या १,४०० दिंड्यांना प्रत्येकी २० हजारांचे अनुदान
Mumbai: आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने वारकरी संप्रदायासाठी महत्त्वाचा निर्णय घेत मानाच्या पालख्यांसोबत पंढरपूरकडे प्रस्थान करणाऱ्या १,४०० मानाच्या दिंड्यांना प्रत्येकी २० हजार रुपयांचे आर्थिक अनुदान जाहीर केले आहे. या योजनेसाठी एकूण २ कोटी ८० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून त्यासंदर्भातील शासन निर्णय गुरुवारी जारी करण्यात आला. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत हा निधी उपलब्ध करून देण्यात येणार असून मुख्यमंत्री वारकरी महामंडळाच्या माध्यमातून अनुदानाचे वितरण करण्यात येणार आहे.
या निर्णयाची माहिती राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिली. त्यांनी सांगितले की, वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा, सामाजिक समतेचा आणि अध्यात्मिक वारशाचा अविभाज्य भाग आहे. दरवर्षी लाखो वारकरी संतांच्या पालख्यांसह पायी वारी करत पंढरपूरमध्ये विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी पोहोचतात. या वारकऱ्यांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात आणि वारीची परंपरा अधिक सक्षम व्हावी, यासाठी राज्य सरकार सातत्याने प्रयत्नशील आहे.
Women farmers bill : शेतजमीन नसली तरी मिळणार ‘महिला शेतकरी’चा दर्जा
मुख्यमंत्री वारकरी महामंडळाची स्थापना २०२४ मध्ये करण्यात आली होती. या महामंडळाच्या माध्यमातून मानाच्या दिंड्यांना आर्थिक सहाय्य देण्याची योजना सुरू करण्यात आली असून यंदा सलग तिसऱ्या वर्षी हे अनुदान वितरित करण्यात येणार आहे. आषाढी एकादशी वारीदरम्यान मानाच्या दहा पालख्यांसोबत सहभागी होणाऱ्या १,४०० दिंड्यांना प्रत्येकी २० हजार रुपये देण्यात येणार आहेत. या निधीच्या वितरणासाठी विभागीय आयुक्त, पुणे यांच्याकडे प्रशासकीय जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
दरम्यान, राज्यभरात आषाढी वारीचे वातावरण रंगू लागले आहे. बुलढाणा येथून श्री संत गजानन महाराजांची पालखी मार्गस्थ झाली असून जळगावमधून संत मुक्ताईंच्या पालखीनेही पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान केले आहे. आगामी काही दिवसांत देहू येथून श्री संत तुकाराम महाराज आणि आळंदी येथून श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्यांचेही प्रस्थान होणार आहे. त्यामुळे राज्यभरातून लाखो वारकरी पायी वारीत सहभागी होण्यासाठी सज्ज झाले आहेत.
Waives royalty : शेतकऱ्यांना मोठा दिलासा! शेतीकामासाठी माती, मुरूमवरील रॉयल्टी रद्द
यंदा पावसाने वेळेत हजेरी लावल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे. अनेक भागांत पेरणीची कामे सुरू झाली असून त्याचबरोबर पंढरीच्या भेटीची ओढही वारकऱ्यांना लागली आहे. यावर्षी २५ जुलै रोजी आषाढी एकादशी साजरी होणार असून त्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक पंढरपूरकडे रवाना होत आहेत.
वारीदरम्यान वारकऱ्यांना आवश्यक सुविधा, सुरक्षितता, स्वच्छता, आरोग्य सेवा, पिण्याचे पाणी आणि निवास व्यवस्थेबाबत शासनाकडून विविध विभागांच्या माध्यमातून नियोजन करण्यात येत आहे. वारकरी संप्रदायाची समृद्ध परंपरा जपणे, तिचे संवर्धन करणे आणि वारकऱ्यांच्या कल्याणासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य देणे ही राज्य सरकारची भूमिका असल्याचेही राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ यांनी स्पष्ट केले.
__








