eknath-shinde-health-update-admitted-to-thane-private-hospital-work-stress : कामाच्या अतिताणामुळे प्रकृती बिघडल्याची माहिती
Thane : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांना प्रकृती अस्वस्थ झाल्याने शुक्रवारी ठाण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून सततचा कामाचा ताण, प्रवास आणि राजकीय व्यस्ततेमुळे त्यांच्या प्रकृतीवर परिणाम झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सध्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे पक्षातील सूत्रांनी स्पष्ट केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विधिमंडळाचे कामकाज सुरू असताना एकनाथ शिंदे यांना ताप आणि अशक्तपणाचा त्रास जाणवू लागला. प्रकृती अधिक बिघडू नये म्हणून त्यांना तातडीने ठाण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिल्याचे सांगितले जात आहे.
प्रकृती अस्वस्थ झाल्यामुळे ठाण्यात आयोजित करण्यात आलेले सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले. धुळ्यातील ठाकरे गटाच्या उपनेत्या शुभांगी पाटील यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रमही पुढे ढकलण्यात आला. त्यानंतर रात्री उशिरा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत शुभांगी पाटील यांनी शिवसेनेत अधिकृत प्रवेश केला.
Revenue reforms : जिल्हाधिकारी ते आरडीसी अधिकाऱ्यांच्या अधिकारांचे नवे वाटप
गेल्या काही दिवसांत राज्याच्या राजकारणात वेगवान घडामोडी घडत असून त्यामध्ये एकनाथ शिंदे यांची भूमिका अत्यंत सक्रिय राहिली आहे. विविध राजकीय बैठका, दिल्ली दौरे, पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी सुरू असलेल्या हालचाली तसेच विधानमंडळ अधिवेशनातील व्यस्त कार्यक्रमामुळे त्यांच्यावर मोठा कामाचा ताण असल्याचे बोलले जात आहे. याच पार्श्वभूमीवर त्यांच्या प्रकृतीवर परिणाम झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, नागरिक आणि कार्यकर्त्यांनी कोणतीही चिंता करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. उपचारांना त्यांचा चांगला प्रतिसाद मिळत असून प्रकृती स्थिर आहे. आवश्यक वैद्यकीय तपासण्या पूर्ण झाल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुढील उपचार आणि विश्रांतीचे नियोजन करण्यात येणार असल्याची माहितीही समोर आली आहे.
राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडल्याची बातमी समोर आल्यानंतर राज्यभरातील कार्यकर्ते आणि समर्थकांनी त्यांच्या लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे.
___








