sharad pawar NCP aggressive over Anjali damania’s allegations against parth pawar : पुरावे असतील तर न्यायालयात सादर करण्याचे आव्हान
Nagpur सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया नेहमीच पवार कुटुंबीयांना लक्ष्य करत आल्या असून, आता राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते पार्थ पवार यांच्यावर त्यांनी केलेल्या आरोपांमुळे राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे.
अंजली दमानिया या विरोधकांच्या सांगण्यावरून आणि त्यांची सुपारी घेऊन पार्थ पवार यांच्यावर वारंवार बिनबुडाचे आरोप करत आहेत. जर त्यांच्याकडे ठोस पुरावे असतील तर त्यांनी ते न्यायालयात सादर करावेत, अन्यथा ही बदनामी थांबवावी. राष्ट्रवादी काँग्रेस ही बदनामी अजिबात सहन करणार नाही, असा तीव्र इशारा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नागपूर जिल्हा कार्याध्यक्ष तथा नरखेड पंचायत समितीचे माजी सभापती नरेश अरसडे यांनी दिला आहे. दमानिया यांच्या या राजकीय आरोपांना आता जिल्हा पातळीवर आंदोलने करून ‘जशास तसे’ उत्तर देण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे.
अंजली दमानिया यांनी पार्थ पवार यांच्यावर पुण्यातील मुंढवा-कोरेगाव पार्क परिसरातील कथित जमीन व्यवहारासंदर्भात गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणी एफआयआर दाखल करण्याची, कॉल रेकॉर्ड्सची चौकशी करण्याची आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
या प्रकरणाची दखल घेत महाराष्ट्र शासनाने चौकशी समिती नेमली असून संबंधित जमीन व्यवहार, मूल्यांकन प्रक्रिया, नोंदणी आणि अधिकाऱ्यांच्या भूमिकेची तपासणी सध्या सुरू आहे. तसेच या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयानेही तपासाच्या व्याप्तीबाबत काही प्रश्न उपस्थित केल्याची चर्चा आहे. मात्र, हे सर्व आरोप अद्याप कोणत्याही न्यायालयात किंवा अधिकृत तपासात सिद्ध झालेले नाहीत.
या पार्श्वभूमीवर बोलताना नरेश अरसडे म्हणाले की, आरोप सिद्ध झालेले नसतानाही अंजली दमानिया स्वतःला न्यायाधीश समजून स्वतःच तर्क मांडत आहेत आणि पार्थ पवार यांची जाणीवपूर्वक बदनामी करत आहेत. यापूर्वीही त्यांनी अनेक नेत्यांवर आरोप केले, मात्र त्यापैकी बहुतांश आरोप कधीच सिद्ध होऊ शकले नाहीत. पार्थ पवार यांच्यावरील सर्व आरोप आम्ही पूर्णपणे फेटाळून लावतो.
Gulf tensions : आखातात तणाव पुन्हा शिगेला, अमेरिका-इराण युद्धबंदीवर प्रश्नचिन्ह
माध्यमांसमोर केवळ प्रसिद्धीसाठी आणि एखाद्या नेत्याची प्रतिमा मलिन करण्यासाठी असे आरोप केले जात असल्याचा दावा अरसडे यांनी केला आहे. तसेच, दमानिया यांनी आपली बदनामीची मोहीम न थांबवल्यास संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र आंदोलन उभारले जाईल आणि निषेध म्हणून दमानिया यांच्या पुतळ्याचे दहन केले जाईल, असा आक्रमक इशाराही राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने देण्यात आला आहे.








