Officials absent in loan waiver meeting, Sharad Pawar NCP aggressive : मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबईत झाली बैठक, रोहित पवारांची उपस्थिती
Nagpur राज्यातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या विनाअट सरसकट कर्जमाफीच्या मुद्द्यावर बोलावण्यात आलेली विशेष बैठक शासकीय अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे रद्द झाली आहे. सरकारच्या या उदासीन आणि बेजबाबदार भूमिकेवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाच्या नेत्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. हा अवमान केवळ लोकप्रतिनिधींचा नसून, राज्यातील कष्टकरी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे, अशा शब्दांत त्यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
कर्जमाफीच्या संवेदनशील विषयावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार आज मुंबई येथील ‘महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन ऑफ ट्रान्सफॉर्मेशन’ (मित्र) च्या नरिमन पॉईंट येथील कार्यालयात सकाळी १०:३० वाजता समिती प्रमुख प्रवीणसिंह परदेशी यांच्यासोबत एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. शेतकऱ्यांना विनाअट सरसकट कर्जमाफी मिळावी, हाच या बैठकीचा मुख्य अजेंडा होता. या बैठकीसाठी ठरल्यानुसार आमदार रोहित पवार यांच्यासह संपूर्ण शिष्टमंडळ वेळेवर उपस्थित राहिले होते.
Bacchu Kadu : ‘काँग्रेसची मते कुठे गेली?’ : बच्चू कडूंनी डिवचले
या शिष्टमंडळामध्ये सलील देशमुख यांच्यासह आमदार सतेज पाटील, महादेव जानकर, आमदार संदीप क्षीरसागर आणि अजित नवले प्रामुख्याने उपस्थित होते. परंतु, इतक्या महत्त्वाच्या बैठकीला शासनाचा एकही प्रमुख अधिकारी उपस्थित नव्हता. लोकप्रतिनिधी आणि शिष्टमंडळ वाट पाहत असतानाच, अखेर बैठक रद्द झाली असल्याचा निरोप त्यांना फोनवरून देण्यात आला.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर हे सरकार किती गंभीर आहे, हे आज पुन्हा एकदा सिद्ध झाले असून सरकारच्या या भूमिकेमुळे त्यांचे ढोंगीपण, लबाडी आणि विश्वासघातकी चेहरा पुन्हा एकदा जनतेसमोर उघडा पडला आहे. एका बाजूला शेतकऱ्यांचे कैवारी असल्याचे सोंग घ्यायचे आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्या हक्काच्या कर्जमाफीच्या बैठकीकडे पाठ फिरवायची, हा राज्याचा आणि शेतकऱ्यांचा अपमान असल्याचे मत सलील देशमुख यांनी व्यक्त केले.
राज्यातील शेतकरी सध्या अत्यंत कठीण परिस्थितीतून जात आहे. अशा वेळी त्यांना विनाअट सरसकट कर्जमाफी मिळणे अत्यंत गरजेचे आहे. मात्र, या अत्यंत संवेदनशील विषयावर इतकी उदासीनता दाखवणाऱ्या या सरकारला महाराष्ट्रातील जनता आणि शेतकरी कधीही माफ करणार नाहीत. या प्रकारानंतर आता शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा अधिक चिघळण्याची शक्यता असून, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष याविरोधात अधिक आक्रमक पावले उचलणार असल्याचे सलील देशमुख यावेळी म्हणाले.








