व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Sonam Wangchuk : २६ दिवसांच्या उपोषणानंतर सोनम वांगचुक यांचा मोठा निर्णय

Sonam Wangchuk : २६ दिवसांच्या उपोषणानंतर सोनम वांगचुक यांचा मोठा निर्णय

sonam-wangchuk-ended-26-day-hunger-strike-after-centre-assurance-abhijit-deepke-reaction-marathi-news : केंद्र सरकारच्या तीन आश्वासनांनंतर आंदोलन स्थगित, अभिजीत दीपकें आंदोलनावर ठाम

New Delhi: सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी तब्बल २६ दिवसांच्या उपोषणानंतर अखेर आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. नीट पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई, शिक्षण व्यवस्थेत पारदर्शकता आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळावा या मागण्यांसाठी त्यांनी २८ जूनपासून आमरण उपोषण सुरू केले होते. अखेर केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा आणि केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर केंद्र सरकारने काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर सकारात्मक भूमिका घेतल्याने वांगचुक यांनी उपोषण मागे घेण्याची घोषणा केली.

मध्यरात्री झालेल्या चर्चेनंतर सोनम वांगचुक यांनी सामाजिक माध्यम ‘एक्स’वर पोस्ट करून उपोषण स्थगित करत असल्याची माहिती दिली. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावत असल्याने त्यांच्यावर दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात उपचार सुरू होते. डॉक्टरांचा सल्ला आणि न्यायालयाच्या निर्देशांनुसार त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

NEET paper leak : लाठीचार्जच्या निषेधार्थ साखरखेर्डा बंद; वंचित बहुजन आघाडीच्या हाकेला व्यापाऱ्यांचा प्रतिसाद

केंद्रीय मंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेनंतर केंद्र सरकारने तीन महत्त्वाच्या मुद्द्यांवर सकारात्मक भूमिका घेतली असल्याचे सांगण्यात आले. २० जुलै रोजी शांततेत आंदोलन करून संसदेकडे मोर्चा काढणाऱ्या विद्यार्थ्यांवर कोणताही गुन्हा दाखल केला जाणार नाही. नीट पेपरफुटी आणि शिक्षण व्यवस्थेतील आवश्यक सुधारणांवर संसदेत चर्चा करण्यास सरकार तयार आहे. नीट पेपरफुटी प्रकरणामुळे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई देण्याच्या प्रस्तावाचा विचार केला जाईल. या आश्वासनांनंतर सोनम वांगचुक यांनी उपोषण थांबवण्याचा निर्णय घेतला. त्यांनी विद्यार्थ्यांच्या संघर्षाला मिळालेला हा महत्त्वाचा टप्पा असल्याचेही नमूद केले.

सोनम वांगचुक यांनी उपोषण स्थगित केल्यानंतर कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. त्यांनी सोनम वांगचुक यांच्या धैर्याचे आणि त्यागाचे कौतुक करत त्यांचे मनःपूर्वक आभार मानले. दीपके म्हणाले की, “सोनम सरांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून देशातील विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे संपूर्ण देशाचे लक्ष वेधले. त्यांच्या २६ दिवसांच्या उपोषणानंतर त्यांनी आंदोलन स्थगित केल्याने आम्हाला मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांचे योगदान देश कधीही विसरणार नाही.”

त्याचबरोबर त्यांनी स्पष्ट केले की, कॉकरोच जनता पार्टीचे जंतर-मंतर येथे सुरू असलेले शांततापूर्ण आंदोलन मात्र सुरूच राहणार आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा देईपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नसल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.

NEET Paper leak : उद्धव-राज ठाकरे पुन्हा एकत्र, सरकारविरोधात करणार संयुक्त शक्ती प्रदर्शन, हुल्लडबाजांना फोडून काढण्याचा खणखणीत इशारा

सोनम वांगचुक यांनी सुरू केलेल्या उपोषणामुळे नीट पेपरफुटी प्रकरण, स्पर्धा परीक्षांमधील गैरव्यवहार आणि शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकतेचा मुद्दा पुन्हा राष्ट्रीय स्तरावर चर्चेत आला. विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, परीक्षा प्रक्रिया विश्वासार्ह व्हावी आणि दोषींवर कठोर कारवाई व्हावी, या प्रमुख मागण्यांसाठी त्यांनी आंदोलन केले.

उपोषणादरम्यान त्यांची प्रकृती खालावत असतानाही त्यांनी आंदोलन सुरू ठेवले. अखेर केंद्र सरकारकडून काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर सकारात्मक आश्वासन मिळाल्यानंतर त्यांनी उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला. मात्र, नीट पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई आणि शिक्षण व्यवस्थेतील सुधारणा या मागण्यांवरील जनआंदोलन अद्याप कायम असल्याचे आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले आहे.

error: Content is protected !!