Pravin Pote Patil will conduct an on-site inspection with officials, amid a flyover accident : जखमी महिलेवर सर्वोत्तम वैद्यकीय उपचार करण्याचे निर्देश
Amravati राजापेठ उड्डाणपुलावर झालेल्या भीषण अपघातानंतर विधानपरिषदेचे आमदार प्रवीण पोटे पाटील यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. अपघातात मृत्यू झालेल्या महिलेप्रती त्यांनी शोकसंवेदना व्यक्त करत जखमी महिलेवर सर्वोत्तम वैद्यकीय उपचार करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. तसेच अपघाताला कारणीभूत असलेल्या दोषींवर कठोर गुन्हे दाखल करून कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश पोलिस प्रशासनाला दिल्याचे त्यांनी सांगितले.
राजापेठ चौकात सुरू असलेल्या स्वागत प्रवेशद्वाराच्या बांधकामामुळे अंबादेवीकडे जाणारा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे उड्डाणपुलासह मुख्य मार्गावरील वाहतुकीचा ताण वाढल्याने अपघाताचा धोका निर्माण झाल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी केली होती. या तक्रारींची गंभीर दखल घेत पोटे पाटील यांनी तातडीने संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष पाहणी करण्याचा निर्णय घेतला आहे.
आज दुपारी १२ वाजता सार्वजनिक बांधकाम विभाग, महानगरपालिका आणि पोलिस प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह ते अपघातस्थळाची पाहणी करणार असून, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजनांवर चर्चा केली जाणार आहे.
सुरक्षेसाठी उपाययोजनांवर भर
पाहणीदरम्यान उड्डाणपुलावरील अपघातप्रवण ठिकाणांची (ब्लॅक स्पॉट) निश्चिती, अंबादेवी मार्ग बंद असल्याने वाढलेल्या वाहतुकीसाठी पर्यायी मार्गांचे नियोजन, तसेच आवश्यकतेनुसार गतिरोधक, दिशादर्शक फलक आणि इतर सुरक्षा उपाययोजनांचा आढावा घेतला जाणार आहे.
Cabinet decision : ग्रामपंचायत सदस्यांना १२ महिन्यांत सादर करावे लागणार जात वैधता प्रमाणपत्र
प्रवीण पोटे पाटील म्हणाले, “राजापेठ उड्डाणपुलावरील अपघात अत्यंत दुर्दैवी असून नागरिकांच्या जीवाशी खेळणारा ढिसाळ कारभार खपवून घेतला जाणार नाही. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाच्या समन्वयाने कायमस्वरूपी वाहतूक आराखडा तयार करण्यात येईल. गरज भासल्यास कठोर निर्णय घेण्यासही मागेपुढे पाहिले जाणार नाही.”








