व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Rain red alert : राज्यात पावसाचा कहर; अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट

Rain red alert : राज्यात पावसाचा कहर; अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट

maharashtra-heavy-rain-red-alert-flood-situation-rivers-dams-overflow : नद्या – धरणे तुडुंब, नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन

Mumbai : राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला असून, अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. भारतीय हवामान विभागाने यवतमाळ, जळगाव आणि नाशिकसह अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केला असून, पुढील २४ तासांत अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. नदी-नाले आणि धरणे ओसंडून वाहत असल्याने प्रशासनाने नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे.
अमरावती, यवतमाळ, जळगाव, नाशिक, धुळे, वाशिम, सोलापूर आणि पुणे जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कायम असून, अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क झाले असून, काही भागांमध्ये शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यात मुसळधार पावसामुळे शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, नदी-नाल्यांच्या परिसरात जाणे टाळण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

District Bank Election : जिल्हा बँक निवडणुकीत माघारीला ब्रेक; शिंगणे-जाधवांच्या बिनविरोधनंतर राजकीय घडामोडींना वेग

नाशिक जिल्ह्याला हवामान विभागाने पुढील काही तासांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणातून सुमारे २ हजार ४९८ क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना विशेष खबरदारी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
जळगाव जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस सुरू असून, जामनेर तालुक्यातील वाकी नदीला पूर आला आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरडे असलेले नदीपात्र अवघ्या चोवीस तासांत दुथडी भरून वाहू लागले आहे. हतनूर धरणाचे तब्बल ३६ दरवाजे उघडण्यात आले असून, सुमारे ७८ हजार क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
मुक्ताईनगर, भुसावळ, रावेर आणि यावल परिसरातील अनेक नदी-नाले तुडुंब भरले असून, सातपुडा पर्वतरांगांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे कुंड धरणही भरले आहे. मनुदेवी धबधबा प्रवाहित झाला असून, नदीकाठच्या भागात जाणे टाळण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Central Bank Khamgao : कर्जमाफीच्या वादातून स्वाभिमानी’च्या जिल्हाध्यक्षांनी बँक व्यवस्थापकाच्या श्रीमुखात भडकावली

वाशिम जिल्ह्यात रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे पैनगंगा नदीला पूर आला असून, नदीकाठच्या गावांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. अनेक लहान-मोठे नाले आणि ओढे भरून वाहत असल्याने नागरिकांना सुरक्षित ठिकाणी राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

धुळे शहरातही मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक सखल भागांमध्ये पाणी साचल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे. प्रशासनाकडून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे.

दरम्यान, भीमा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने सोलापूर जिल्ह्यातील चिंचपूर बंधारा पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांमधील संपर्क तात्पुरता तुटला असून, बंधाऱ्यावरून होणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे.

हवामान विभागाने पुढील २४ तासांत राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे, पूरग्रस्त भागात जाणे टाळावे आणि प्रशासनाने जारी केलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

error: Content is protected !!