व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Ajit doval : स्वातंत्र्य म्हणजे मनाला वाटेल ते करणे नव्हे

Ajit doval : स्वातंत्र्य म्हणजे मनाला वाटेल ते करणे नव्हे

ajit-doval-speech-in-pune-lokmanya-tilak-national-award-message-to-youth-and-gen-z : अजित डोवाल यांचा पुण्यातून तरुणांना संदेश

Pune: पुण्यात लोकमान्य टिळक यांच्या १०६व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्यात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना यंदाचा ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर अजित डोवाल यांनी केलेल्या भाषणाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी त्यांनी आजच्या तरुण पिढीला स्वातंत्र्याचा खरा अर्थ समजून घेण्याचे आवाहन करत राष्ट्रसेवा, त्याग आणि एकजुटीचा संदेश दिला.

या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. पुरस्कार स्वीकारताना अजित डोवाल यांनी नम्रपणे आपल्या भावना व्यक्त करत, “माझ्याबद्दल व्यक्त करण्यात आलेल्या शब्दांसाठी मी सर्वांचा ऋणी आहे. हा सन्मान स्वीकारताना मी स्वतःला गौरवान्वित आणि नतमस्तक समजतो,” असे म्हटले.
भाषणादरम्यान अजित डोवाल यांनी आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला. “माझ्या शिक्षणाची सुरुवात पुण्यातून झाली. मी सुमारे दीड वर्ष पुण्यात होतो आणि प्रत्येक मंगळवारी चतुःशृंगी मंदिरात दर्शनासाठी जात होतो. शाळेत असताना एका शिक्षकांनी लोकमान्य टिळकांच्या विचारांविषयी सांगितले होते. त्याच पुण्यात आज त्यांच्या नावाचा पुरस्कार मिळेल, असा विचार मी कधीच केला नव्हता,” असे ते म्हणाले.

 

Eknath Shinde : काँग्रेसला रामराम ठोकणाऱ्या नेत्याने घेतली एकनाथ शिंदेंची भेट

आजच्या युवकांना उद्देशून बोलताना डोवाल यांनी स्वातंत्र्याच्या संकल्पनेवर भाष्य केले. “आज अनेक तरुणांना स्वातंत्र्य म्हणजे मनात येईल ते करणे असे वाटते. मात्र, लोकमान्य टिळकांनी ज्या स्वातंत्र्यासाठी संघर्ष केला, त्याचा अर्थ केवळ वैयक्तिक स्वातंत्र्य नव्हता, तर राष्ट्राच्या उभारणीसाठीची जबाबदारीही त्यामध्ये होती,” असे त्यांनी स्पष्ट केले.
ब्रिटिशांच्या अत्याचाराच्या काळात लोकमान्य टिळकांनी दाखवलेल्या धैर्याचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, अन्यायाविरोधात उभे राहण्याची ताकद आणि समाजाला दिशा देण्याची क्षमता टिळकांमध्ये होती.

महाराष्ट्रातील प्लेगच्या साथीचा संदर्भ देत अजित डोवाल म्हणाले की, “प्लेगच्या काळात लोकमान्य टिळकांनी आपल्या २१ वर्षीय मुलाला गमावले, तरीही त्यांनी समाजसेवा आणि राष्ट्रकार्य थांबवले नाही. संकटांच्या काळातही त्यांनी जनतेसाठी काम करण्याची भूमिका कायम ठेवली.”
यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, पेशवे बाजीराव, तानाजी मालुसरे, मुरारबाजी देशपांडे, महर्षी कर्वे, गोपाळ कृष्ण गोखले, गोपाळ गणेश आगरकर आणि सेनापती बापट यांच्या कार्याचाही गौरव केला.
लोकमान्य टिळकांच्या प्रसिद्ध घोषणेचा संदर्भ देताना डोवाल म्हणाले, “टिळकांनी ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे’ असा नारा दिला होता. आज जर ते आपल्यात असते, तर त्यांनी भारताला विकसित, शक्तिशाली आणि आत्मनिर्भर बनवणे हा आपला जन्मसिद्ध हक्क असल्याचे सांगितले असते.”

Disqualification notices: २३ नगरसेवकांना अपात्रतेच्या नोटिस, भाजपसह एमआयएमच्या नेत्यांवर संकट

देशासमोरील अंतर्गत आणि बाह्य आव्हानांचा उल्लेख करत अजित डोवाल यांनी युवकांना राष्ट्रहिताला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे आवाहन केले. “जे राष्ट्रहिताचे नाही, ते आपल्याही हिताचे नाही. देशाच्या सुरक्षेसाठी, विकासासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करण्याची गरज आहे,” असे ते म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाचा उल्लेख करत त्यांनी देशाच्या प्रगतीबाबत विश्वास व्यक्त केला. तसेच, भारताला महासत्ता बनवण्यासाठी आजच्या तरुणांनी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे सांगत त्यांनी उपस्थितांना राष्ट्रसेवेचा संकल्प करण्याचे आवाहन केले.
_

error: Content is protected !!