56,000 farmers to benefit from loan waiver; ₹36,585 crore allocated for the scheme : दोन लाखांपर्यंतच्या कर्जमाफीचा निर्णय; ३६ हजार ५८५ कोटी रुपयांची तरतूद
Nagpur राज्यातील बळीराजासाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. महायुती सरकारने निवडणुकीच्या काळात दिलेल्या वचनाची पूर्तता करत राज्यातील शेतकऱ्यांसाठी दोन लाखांपर्यंतच्या कर्जमाफीचा मोठा निर्णय घेतला आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात याकरिता तरतूद करण्यात आली होती, मात्र तांत्रिक बाबींमुळे अंमलबजावणी रखडली होती. आता सर्व तांत्रिक अडचणी दूर होऊन उद्या मंगळवारी कर्जमाफीची संपूर्ण रक्कम संबंधित खात्यात वर्ग केली जाणार असून, त्यानंतर ती थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होईल.
या महत्त्वाकांक्षी योजनेसाठी राज्य सरकारने मोठी आर्थिक तजवीज केली असून, याद्वारे ३६ हजार ५८५ कोटी रुपयांची जुळवाजुळव करण्यात आली आहे. या विक्रमी निधीमुळे राज्यातील तब्बल ५६ लाख शेतकरी कर्जमुक्त होणार असून, पात्र शेतकऱ्यांना सरसकट दोन लाखांपर्यंतचे कर्ज माफ केले जाणार आहे.
महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर शेतकरी कर्जमाफीसाठी सरकारवर सातत्याने दबाव वाढवला जात होता. विशेषतः आमदार बच्चू कडू यांनी यासाठी मोठे आंदोलन करत नागपूरमध्ये तब्बल तीन दिवस तीव्र ‘चक्काजाम’ केला होता. त्यानंतर शासनाने एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली आणि अलीकडेच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच्या मंत्रिमंडळ बैठकीत कर्जमाफीच्या निर्णयावर अंतिम शिक्कामोर्तब करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही आजवरची सर्वात मोठी कर्जमाफी असल्याचा दावा केला आहे.
एकीकडे सरकार या योजनेला ऐतिहासिक ठरवत असताना, दुसरीकडे विरोधकांनी यावर आक्रमक भूमिका घेत केवळ दोन लाखांची मर्यादा न ठेवता सरसकट सर्व शेतकऱ्यांचा सातबारा पूर्णपणे कोरा करण्याची मागणी केली आहे. असे असले तरी, उद्या मंगळवारी प्रत्यक्ष निधी वर्ग होत असल्याने वर्षभर प्रतीक्षा करणाऱ्या लाखो शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार असून, सर्वांचे लक्ष या ऐतिहासिक घडामोडीकडे लागले आहे.








