Opposition to the Samruddhi Expressway expansion emerges from Vidarbha itself : वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा, तीव्र लोकआंदोलन छेडण्याचा इशारा
Nagpur राज्यातील नव्या महामार्ग प्रकल्पांवरवरून राजकीय वातावरण तापले असून, मुख्यमंत्र्यांच्या ‘भक्ती-शक्ती महामार्गा’पाठोपाठ आता ‘समृद्धी महामार्गा’च्या विस्तारालाही पश्चिम महाराष्ट्रानंतर विदर्भातून जोरदार विरोध सुरू झाला आहे. समृद्धी महामार्गाच्या चंद्रपूरपर्यंतच्या विस्तारासाठी शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी बळजोरीने संपादित केल्या जात असल्याचा गंभीर आरोप करत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी याविरोधात तीव्र लोकआंदोलनाचा इशारा दिला आहे. त्यांनी समृद्धी विस्तारासह विविध मुद्द्यांवरून राज्य सरकारवर निशाणा साधला.
नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गाचा विस्तार आता विदर्भातील भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यांपर्यंत करण्यात येत असून यासाठी सध्या जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू आहे. यावर बोलताना वडेट्टीवार म्हणाले की, विस्ताराच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या हक्काच्या सुपीक जमिनी बळकावण्याचे प्रयत्न सुरू असून इच्छेविरुद्ध जमीन मोजणीसाठी पोलिस बळाचा वापर केला जात असल्याच्या तक्रारी अत्यंत गंभीर आहेत. विकासाच्या नावाखाली बळीराज्याला भूमिहीन करून जर काही निवडक कंत्राटदार आणि उद्योगसमूहांचाच फायदा करून दिला जात असेल, तर हा विकास जनहिताचा नाही. सरकारने या प्रकल्पाचा तात्काळ फेरविचार करावा, अन्यथा तीव्र जनआंदोलन उभे केले जाईल, असा इशारा त्यांनी दिला.
Akola Congress : जुन्यांना मानाचे स्थान, कार्यकर्त्यांना सन्मान आणि नवोदितांना संधी
याचबरोबर, दिल्लीतील जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्यांनी केलेल्या कथित अपमानास्पद वक्तव्यावर संताप व्यक्त करत, देशाच्या भविष्यासाठी लढणाऱ्या तरुणांना देशद्रोही ठरवणे अतिशय दुर्दैवी असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी व्यक्त केलेली नाराजी ही भाजप पक्षात ओबीसी नेतृत्वाला मिळणाऱ्या दुय्यम वागणुकीचे आणि वास्तवाचे दर्शन घडवणारी असून पक्षात ओबीसी समाजाला न्याय मिळत नसल्याच्या भावनेतूनच त्या उद्वेग व्यक्त करत आहेत, असे ते म्हणाले.
याशिवाय, नाशिक कुंभमेळ्याच्या तयारीतील कामांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, स्थानिक विकासाकडे दुर्लक्ष करून केवळ कंत्राटी व्यवस्थेत मोठा गैरव्यवहार सुरू असल्याचा आणि ठराविक मोजक्याच कंत्राटदारांना कामे दिल्याने नाशिकमधील रस्त्यांची पार दुरावस्था झाल्याचा गंभीर आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला. कुंभमेळ्याच्या नावाखाली सुरू असलेली ही लूट थांबवून रस्त्यांची कामे दर्जेदार करावीत, अशी मागणीही त्यांनी या वेळी केली.








