sunil-tatkare-indirect-warning-to-dhananjay-munde-over-intervention-in-sunetra-pawar-press-conference : सुनील तटकरेंचा धनंजय मुंडेंना अप्रत्यक्ष इशारा
Mumbai : बीड जिल्ह्यातील पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या पत्रकार परिषदेत आमदार धनंजय मुंडे यांनी केलेल्या हस्तक्षेपावरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चर्चांना उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेत भाष्य करताना, पालकमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत स्थानिक आमदाराने उपस्थित राहणे योग्य असले तरी स्वतः पुढाकार घेऊन संवाद साधणे योग्य नसल्याचे स्पष्ट मत व्यक्त केले. त्यामुळे तटकरेंनी धनंजय मुंडेंना अप्रत्यक्षपणे कान टोचल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना सुनील तटकरे म्हणाले की, बीडमधील नेमका प्रसंग काय घडला, याची सविस्तर माहिती अद्याप मिळालेली नाही. मात्र, कोणत्याही जिल्ह्यात पालकमंत्र्यांची पत्रकार परिषद ही त्या प्रमुख व्यक्तीची असते. अशा वेळी इतरांनी केवळ उपस्थित राहावे, पण पत्रकार परिषदेत सक्रिय सहभाग घेऊ नये, असा संकेत राजकारणात पाळला जातो.
तटकरे यांनी स्वतःचा अनुभव सांगताना नमूद केले की, चंद्रशेखर बावनकुळे त्यांच्या जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते, तेव्हा ते पत्रकार परिषदेत उपस्थित होते; मात्र त्यांनी कोणत्याही प्रश्नावर भाष्य केले नव्हते. पत्रकार परिषदेत मुख्य व्यक्तीलाच संवाद साधू द्यावा, हे प्रत्येकाने लक्षात ठेवणे गरजेचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
Gudhe Vs Tiwari : माफी नाहीच! प्रफुल गुडधे देणार दयाशंकर तिवारींच्या दाव्याला जोरदार प्रत्युत्तर
सुनेत्रा पवार या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष असून त्या प्रसारमाध्यमांसमोर कोणत्याही विषयाची प्रभावी मांडणी करण्यास सक्षम असल्याचा विश्वास पक्षातील सर्व सहकाऱ्यांना असल्याचेही तटकरे यांनी स्पष्ट केले. बीडमधील घटनेची पार्श्वभूमी समजून घेणे आवश्यक असले, तरी पत्रकार परिषदेत मुख्य व्यक्तीच केंद्रस्थानी असते आणि इतरांनी संयम बाळगणे अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, धनंजय मुंडे यांनीही या वादावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. सुनेत्रा पवार बीड दौऱ्यावर असताना सलग बैठका आणि कार्यक्रमांमुळे त्या भावनिक अवस्थेत होत्या. पत्रकार परिषदेत प्रश्नोत्तरांचे सत्र होणार नसल्याची माहिती आधीच देण्यात आली होती. मात्र, काही प्रश्नांमुळे त्या अधिक भावूक झाल्याचे पाहून आपण हस्तक्षेप केल्याचे मुंडे यांनी सांगितले.
prashant pawar : सपकाळांना काळे फासणाऱ्याला १ लाखांचे बक्षीस जाहीर!
तसेच, पत्रकार परिषदेदरम्यान एका शेतकऱ्याला शांतपणे आपली बाजू मांडण्यास सांगितल्याचा विपर्यास करण्यात आल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. गेल्या काही दिवसांपासून स्वतःविरोधात एकतर्फी वातावरण निर्माण केले जात असल्याचा आरोप करत, आपण केवळ आमदार असून कोणत्याही सत्तापदावर नसतानाही आपल्याला लक्ष्य केले जात असल्याचे मुंडे म्हणाले.
सुनील तटकरे यांच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत शिष्टाचार, नेतृत्वाचा सन्मान आणि पत्रकार परिषदांमधील आचारसंहिता याबाबत नव्याने चर्चा सुरू झाली आहे. बीडमधील हा वाद आगामी काळात कोणते राजकीय वळण घेतो, याकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.








