व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Nirmal Urban : नागपूरच्या निर्मल अर्बन बँकेत राडा; संस्थापक अध्यक्षांवरच ४० कोटींच्या...

Nirmal Urban : नागपूरच्या निर्मल अर्बन बँकेत राडा; संस्थापक अध्यक्षांवरच ४० कोटींच्या कर्जाचा ठपका

nirmal-urban-bank-depositors-protest-financial-crisis-pramod-manmode-loan-controversy : १४०० कोटींच्या बँकेत आर्थिक खडखडाट

Nagpur : नागपूरच्या आर्थिक वर्तुळातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. निर्मल अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेत जमा केलेल्या ठेवी परत मिळत नसल्याने संतप्त ठेवीदारांनी बँकेत मोठा गोंधळ घातला आहे. बँकेची आर्थिक स्थिती डळमळीत झाल्यामुळे अनेक नागरिकांचे लाखो रुपये अडकून पडले असून, वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर बँकेचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद मानमोडे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. परिस्थिती तणावपूर्ण बनल्याने बँकेबाहेर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
निर्मल बँकेच्या कारभारात गंभीर अनियमितता झाल्याच्या तक्रारीनंतर केंद्रीय सहकार विभागाच्या निबंधकांनी विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) माध्यमातून चौकशी केली होती. या चौकशीत बँकेचा कारभार नियमबाह्य आणि अनियमित असल्याचे आढळून आल्यानंतर सहकार विभागाने बँकेवर नवीन ठेवी स्वीकारण्यास निर्बंध घातले. त्यामुळे बँकेकडे येणारा निधी पूर्णपणे थांबला.
दुसरीकडे, बँकेची आर्थिक स्थिती बिघडत असल्याची माहिती समोर येताच ठेवीदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. आपली रक्कम सुरक्षित काढण्यासाठी नागरिकांनी बँकेच्या शाखांमध्ये मोठी गर्दी केली. आतापर्यंत बँकेने सुमारे ३५० कोटी रुपयांच्या ठेवी परत केल्याचे सांगितले जात असले, तरी सध्या बँकेकडे पुरेसा निधी शिल्लक नसल्याची चर्चा आहे. गेल्या महिनाभरापासून ठेवीदार पैसे काढण्यासाठी बँकेच्या फेऱ्या मारत आहेत.

आर्थिक संकटाचा सामना करत असतानाही निर्मल अर्बन बँकेचा एकूण व्यवहार सुमारे १४०० कोटी रुपयांच्या घरात असल्याचे सांगितले जाते. महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्येही बँकेच्या शाखा कार्यरत असून, बँकेने जवळपास ६०० कोटी रुपयांचे कर्जवाटप केले आहे.
या संपूर्ण प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, बँकेचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद मानमोडे हे स्वतःच बँकेचे मोठे कर्जदार असल्याची माहिती समोर आली आहे. मानमोडे यांनी स्वतःच्या बँकेतून तब्बल ४० कोटी रुपयांचे कर्ज घेतल्याचे सांगितले जात असून, त्याबदल्यात मालमत्ता गहाण ठेवल्याचा दावा करण्यात येत आहे.

Sunil Tatkare : पालकमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत आमदारांनी हस्तक्षेप टाळावा!

दरम्यान, उमरेड मार्गावरील जागेवर प्रमोद मानमोडे यांनी मोठी हाऊसिंग स्कीम सुरू केली आहे. विशेष म्हणजे, या प्रकल्पाच्या शेजारीच व्यावसायिक वीरेंद्र कुकरेजा यांच्या हाऊसिंग योजना आहेत. या व्यावसायिक स्पर्धेतूनच कटकारस्थान रचून बँकेला आर्थिक संकटात ढकलण्यात आल्याची चर्चा नागपूरच्या राजकीय आणि व्यावसायिक वर्तुळात रंगू लागली आहे. मात्र, या दाव्यांची अधिकृत पुष्टी झालेली नाही.

राजकीयदृष्ट्याही प्रमोद मानमोडे हे सक्रिय राहिले आहेत. ते यापूर्वी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख होते. सध्या त्यांच्याकडे रामटेक विधानसभा मतदारसंघाच्या सहसंपर्क प्रमुखपदाची जबाबदारी देण्यात आली होती. दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघातून त्यांनी उमेदवारीची मागणी केली होती; मात्र, महाविकास आघाडीत ही जागा काँग्रेसकडे गेल्यानंतर त्यांचे तिकीट कापण्यात आले. त्यानंतर ते पक्षावर नाराज असल्याची चर्चा रंगली होती.

Row over gungi gudiya : सपकाळांच्या प्रतिमेला चपलांचा चोप, राष्ट्रवादी आक्रमक !

यापूर्वी प्रमोद मानमोडे हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही कार्यरत होते. त्यावेळीही त्यांनी दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारीची मागणी केली होती. उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांनी बंडखोरीचा मार्ग स्वीकारला होता.
दरम्यान, निर्मल अर्बन बँकेतील हजारो ठेवीदारांच्या पैशांचे भवितव्य काय, हा प्रश्न आता ऐरणीवर आला असून, बँकेच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी आणि ठेवीदारांना दिलासा मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!