manoj-jarange-patil-madha-speech-kunbi-certificate-government-warning : कुणबी प्रमाणपत्रांवरून पुन्हा आक्रमक भूमिका
Madha : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील पुन्हा आक्रमक झाले आहेत. पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असलेल्या जरांगे यांनी माढा येथे झालेल्या सभेत सरकारच्या कारभारावर जोरदार टीका करत संतप्त इशारा दिला. मराठवाड्यात कुणबी समाजाची चार प्रमाणपत्रे रद्द करण्यात आल्याच्या मुद्द्यावरून त्यांनी सरकारला लक्ष्य केले. यावेळी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
“मी समाजासाठी उपोषण करून जीव देऊ शकतो. तशी वेळ पडली तर कोणाचा जीव घेऊही शकतो. मला त्या वाटेवर नेऊ नका,” असे वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी माढ्यातील सभेत केले. समाजाच्या मागण्यांसाठी आपण कोणत्याही टोकाला जाण्यास तयार असल्याचे सांगताना त्यांनी सरकारने परिस्थिती अधिक चिघळवू नये, असा इशाराही दिला.
माढा येथे दुपारी तीन वाजता सभा होणार होती. मात्र, मनोज जरांगे यांच्या व्यस्त दौऱ्यामुळे सभा रात्री साडेअकराच्या सुमारास पार पडली. जरांगे माढ्यात दाखल होताच समर्थकांनी जेसीबीच्या माध्यमातून फुलांची उधळण करत त्यांचे जोरदार स्वागत केले. त्यानंतर झालेल्या सुमारे तासभराच्या भाषणात त्यांनी मराठा आरक्षण, कुणबी नोंदी आणि प्रमाणपत्रे रद्द करण्याच्या मुद्द्यावरून सरकारवर गंभीर आरोप केले.
Tukaram Mundhe : ठाकरे, शिंदे की फडणवीस? कोण सर्वांत बेस्ट मुख्यमंत्री?
मनोज जरांगे पाटील यांनी भारतीय जनता पक्ष तसेच शिंदे गटावरही जोरदार टीका केली. मराठा समाजाच्या प्रश्नावर सरकारकडून फसवणूक केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. माढ्यातील सभेत त्यांनी भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावरही थेट निशाणा साधला.
“एक वर्षभर मी देवेंद्र फडणवीस यांना काही बोललो नाही. ज्या बावनकुळेंमुळे ते अडचणीत येतात, तर त्यांनी असला कशाला सांभाळायचा? आता मी कोणाला सोडणार नाही,” असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला. मराठा समाजाच्या हक्कांमध्ये अडथळा आणणाऱ्यांना समाज माफ करणार नाही, असा दावाही त्यांनी केला.
माढ्याच्या सभेपूर्वी सोलापूर जिल्ह्यातील वैराग येथे झालेल्या कार्यक्रमातही मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली होती. “देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करू द्या, यांचा माज मोडवल्याशिवाय गप्प बसणार नाही,” अशी संतप्त भूमिका त्यांनी मांडली.
Nana Patole : फडणवीसांच्या त्रासामुळेच शिंदेंची दिल्ली वारी, नाना पटोलेंचा हल्लाबोल
कुणबी प्रमाणपत्रे रद्द करण्याच्या मुद्द्यावरूनही जरांगे पाटील यांनी सरकारवर आरोप केले. देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून चंद्रशेखर बावनकुळे यांनी कुणबी प्रमाणपत्रे रद्द करण्यास सुरुवात केली असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच, एकनाथ शिंदे यांच्या सांगण्यावरून मंत्री संजय शिरसाट यांनी कुणबी नोंदी रद्द करण्याचा प्रयत्न केल्याचा दावाही त्यांनी केला.
मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्राच्या माध्यमातून आरक्षणाचा लाभ मिळावा, या मागणीवरून मनोज जरांगे पाटील सातत्याने आंदोलन करत आहेत. कुणबी नोंदी आणि प्रमाणपत्रांबाबत सरकारच्या निर्णयांवर ते वारंवार आक्षेप घेत आहेत. आता काही प्रमाणपत्रे रद्द झाल्याच्या मुद्द्यामुळे त्यांनी पुन्हा आक्रमक भूमिका घेतली आहे. माढ्यातील सभेत केलेल्या वक्तव्यामुळे हा मुद्दा आणखी तापण्याची शक्यता आहे. सरकारकडून या आरोपांवर आणि जरांगे यांच्या इशाऱ्यावर काय प्रतिक्रिया दिली जाते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
__








