Devotees begin an indefinite hunger strike demanding Bharat Ratna for Rashtrasant Tukdoji Maharaj : शेकडो भक्तांचा पाठिंबा; घोषणा मिळेपर्यंत आंदोलन थांबवणार नसल्याचा निर्धार
Amravati संपूर्ण आयुष्य राष्ट्रसेवेला वाहून घेणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ पुरस्कार देण्यात यावा, या मागणीसाठी गुरुदेवभक्तांनी क्रांतिदिनापासून आंदोलन सुरू केले. तिवसा तहसील कार्यालयासमोर सात गुरुदेवभक्तांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली असून, आंदोलनाला शेकडो भक्तांनी पाठिंबा दिला.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व महात्मा गांधी यांच्या प्रतिमांचे पूजन करून सामूहिकरीत्या क्रांतीज्योत प्रज्वलित करण्यात आली. उपोषणकर्ते विनायक केने यांच्या हस्ते तिलक पूजन करण्यात आले. त्यानंतर तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करून आंदोलनाचे रणशिंग फुंकण्यात आले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ देण्याची मागणी गुरुदेवभक्तांकडून अनेक वर्षांपासून करण्यात येत आहे. यासाठी केंद्र सरकारकडे वेळोवेळी पाठपुरावाही करण्यात आला. मात्र, अद्याप या मागणीची दखल घेण्यात आलेली नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला.
मुकुंद बाबाराव पुनसे, रमेश भाऊराव बोके, जयकुमार शेषराव बोके, हैबतराव गाडगे, शफिक शहा, मनोहर साबळे आणि जगन साबळे यांनी रविवारी दुपारी ४ वाजता अन्नत्याग आंदोलन सुरू केले.
यावेळी ग्रामगीताचार्य विजय बोके, प्रल्हाद पारिसे गुरुजी, मोहन बोके, प्रा. नरेंद्र राऊत, अनिल काळमेघ, अमर वानखडे, अभिजित बोके, सतीश पारधी, रामभाऊ बोकडे, मधुकर केचे, विनायक केने, सुनील देशमुख, रघुनाथ बाविस्कर, प्रकाश बोके, अभिजित बेलुरकर, नरेश भुयार, सुरेश उईके, महादेव गारपवार, श्रीखंडे यावली, देविदास निकाळजे, आसावरी देशमुख, सागर भवते, बबन बोके, उद्धव बेलूरकर, मोहन अग्रवाल, अमोल बोके, प्रदीप बोके, अशोक मनोहर, शरद अग्रवाल, चंद्रशेखर ठाकरे, अनिल नांदणे यांच्यासह शेकडो गुरुदेवभक्त उपस्थित होते.
राज्यभर आंदोलनाची शक्यता
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना ‘भारतरत्न’ मिळेपर्यंत आंदोलन थांबविणार नसल्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. आंदोलनाला समर्थन देण्यासाठी साखळी उपोषणही करण्यात येत आहे. ९ ऑगस्टच्या क्रांतिदिनाचे औचित्य साधून गुरुदेव सेवा मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून राज्यभर आंदोलनात्मक भूमिका घेतली जाण्याची शक्यता आहे. विविध ठिकाणी आंदोलन करून ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना भारतरत्न द्या’, अशी मागणी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, वंचित बहुजन आघाडीने या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे. उपोषणकर्ते रमेश भाऊराव बोके यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना ‘भारतरत्न’ न मिळाल्यास आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.








