व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Harshwardhan Sapkal : अमरावतीच्या स्त्री रुग्णालयातील जळीतकांडावरून काँग्रेस आक्रमक !

Harshwardhan Sapkal : अमरावतीच्या स्त्री रुग्णालयातील जळीतकांडावरून काँग्रेस आक्रमक !

amravati-women-hospital-fire-harshwardhan-sapkals-demand-fire-audit-probe : हर्षवर्धन सपकाळांची फायर ऑडिटसह सखोल चौकशीची मागणी

Mumbai: अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयात लागलेल्या आगीत तीन नवजात बालकांचा मृत्यू झाल्याच्या घटनेने राज्यभरात संतापाची लाट निर्माण झाली आहे. या दुर्घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच राज्यातील रुग्णालयांच्या फायर ऑडिटबाबत सरकारने केलेल्या कारवाईचा हिशोब जनतेसमोर मांडावा, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

मुंबई येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना हर्षवर्धन सपकाळ यांनी अमरावतीतील दुर्घटनेवरून राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला. भंडारा येथील रुग्णालयातील दुर्घटनेनंतर राज्यातील रुग्णालयांचे फायर ऑडिट करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानंतर हे ऑडिट नेमके कसे करण्यात आले, कोणत्या त्रुटी आढळल्या आणि त्यावर काय उपाययोजना करण्यात आल्या, याची माहिती सरकारने द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.

अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील आगीमध्ये नवजात बालकांचा मृत्यू होणे ही अत्यंत वेदनादायी आणि संतापजनक घटना असल्याचे सपकाळ यांनी म्हटले. रुग्णालयांमध्ये रुग्णांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक अग्निसुरक्षा व्यवस्था आहे की नाही, याची नियमित तपासणी होत आहे का, हा प्रश्न या घटनेमुळे पुन्हा ऐरणीवर आला आहे. रुग्णालयातील आगीशी संबंधित सर्व बाबींची सखोल चौकशी करून निष्काळजीपणा किंवा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. तसेच या घटनेची नैतिक जबाबदारी सरकारने स्वीकारली पाहिजे, अशी भूमिका सपकाळ यांनी मांडली.

Tuition Economy : मुळात ‘ट्युशन क्लासेस हवेतच कशाला?’ या प्रश्नाचे उत्तर शोधण्याची वेळ आली!

भंडारा रुग्णालयातील दुर्घटनेनंतर राज्यातील रुग्णालयांचे फायर ऑडिट करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र या आदेशाची प्रत्यक्ष अंमलबजावणी कितपत झाली, किती रुग्णालयांची तपासणी करण्यात आली, कोणत्या रुग्णालयांमध्ये त्रुटी आढळल्या आणि त्या दूर करण्यासाठी काय कारवाई करण्यात आली, याचा तपशील सरकारने जाहीर करावा, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.

अमरावतीच्या दुर्घटनेसोबतच राज्यातील वाढत्या साखरेच्या दरावरूनही हर्षवर्धन सपकाळ यांनी सरकारवर टीका केली. सणासुदीच्या काळात साखरेच्या किमती वाढल्याने सामान्य ग्राहकांच्या खिशावर अतिरिक्त भार पडत असल्याचे त्यांनी म्हटले. साखरेच्या दरवाढीमागे केंद्र आणि राज्य सरकारची धोरणे जबाबदार असल्याचा आरोप करत सरकार महागाईवर नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरल्याची टीका त्यांनी केली. सामान्य जनतेला महागाईचा फटका बसत असताना सरकारचे लक्ष मोजक्या उद्योगपतींच्या हितसंबंधांकडे असल्याचा आरोपही सपकाळ यांनी केला.

सणासुदीच्या काळात साखरेची मागणी वाढत असताना बाजारातील दरात मोठी वाढ होत असल्याने सर्वसामान्य कुटुंबांचे आर्थिक गणित बिघडत असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. साखरेच्या दरावर सरकारचे नियंत्रण आहे की नाही, बाजारातील साठ्याची स्थिती काय आहे आणि दरवाढीमागे नेमकी कारणे कोणती आहेत, याबाबत सरकारने स्पष्टता द्यावी, अशी मागणी होत आहे.

Raju Shetti : राजू शेट्टींचे मोदींना पत्र; देशभरातील साखर गोडाऊन तपासण्याची मागणी

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेलाही हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रत्युत्तर दिले. फडणवीसांनी राहुल गांधींवर टीका करताना प्रत्यक्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जुन्या आश्वासनांकडेच लक्ष वेधले असल्याची बोचरी टीका त्यांनी केली. नरेंद्र मोदी यांनी केलेल्या विविध निवडणूकपूर्व आश्वासनांचा संदर्भ देत सपकाळ यांनी ‘बोलघेवडेपणा’ कोणाचा, असा सवाल उपस्थित केला. राहुल गांधी यांनी देशातील आर्थिक आणि सामाजिक प्रश्नांवर सातत्याने भूमिका मांडली असून त्यातील अनेक मुद्दे नंतर चर्चेच्या केंद्रस्थानी आले, असा दावा त्यांनी केला.

फडणवीसांनी राहुल गांधींवर केलेली टीका म्हणजे ‘वड्याचे तेल वांग्यावर’ काढण्याचा प्रकार असल्याचे सपकाळ म्हणाले. राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद मिळाल्यामुळे भाजपमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असल्याचा दावा त्यांनी केला. कार्यक्रमातील गर्दीबाबत सरकारने चौकशी करण्याची भाषा केली असेल तर सरकार त्यांचेच आहे, त्यांनी खुशाल चौकशी करावी, असे आव्हानही सपकाळ यांनी दिले.

Rohit pawar: मुख्यमंत्र्यांचा ‘जेन Z’ संवाद ही तर राहुल गांधींची कॉपी ; आमदार रोहित पवारांचा भाजपवर हल्लाबोल

राहुल गांधी यांच्या पुण्यातील ‘छात्रों की गुंज’ या विद्यार्थी- केंद्रित कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. या कार्यक्रमासाठी विद्यार्थिनींना पैसे देऊन आणण्यात आल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्याचा संदर्भ देत सपकाळ यांनी त्यावर तीव्र आक्षेप घेतला. विद्यार्थिनींच्या सहभागावर अशा प्रकारचे आरोप करणे हा त्यांचा अपमान असल्याचे सपकाळ यांनी म्हटले. विद्यार्थिनींच्या सन्मानासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली.

अमरावती रुग्णालयातील जळीतकांड, रुग्णालयांचे फायर ऑडिट, साखरेच्या वाढत्या किमती आणि महागाई या मुद्द्यांवरून काँग्रेसने सरकारला लक्ष्य केले आहे. विशेषतः रुग्णालयातील नवजात बालकांच्या मृत्यूच्या घटनेने आरोग्य यंत्रणेतील सुरक्षेच्या उपाययोजनांवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. फायर ऑडिटचे आदेश कागदावरच राहिले की त्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली, रुग्णालयांमधील अग्निसुरक्षा व्यवस्था किती सक्षम आहे आणि अमरावती दुर्घटनेला जबाबदार असलेल्या व्यक्तींवर कोणती कारवाई होणार, याची उत्तरे आता सरकारला द्यावी लागणार आहेत.
हर्षवर्धन सपकाळ यांनी उपस्थित केलेल्या या प्रश्नांमुळे आगामी काळात अमरावती रुग्णालयातील दुर्घटना, राज्यातील फायर ऑडिट आणि महागाईच्या मुद्द्यांवरून सरकार आणि विरोधकांमध्ये राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

__

error: Content is protected !!