Gen Z interaction of devendra Fadnavis is a copy of Rahul Gandhi’s programme; MLA Rohit Pawar attacks BJP : फडणवीसांच्या नागपुरातील ‘युवा मंथन’ कार्यक्रमावर जोरदार निशाणा
Nagpur पुण्यात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी घेतलेल्या ‘छात्रों की गूंज’ या कार्यक्रमावर भाजपने केलेल्या टीकेचा समाचार घेत, राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरदचंद्र पवार गट) आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातील ‘युवा मंथन’ कार्यक्रमावर जोरदार निशाणा साधला आहे. नागपुरात आयोजित मुख्यमंत्र्यांचा हा कार्यक्रम पूर्णपणे ईव्हेंट करून, सेलिब्रिटींना बोलावून गर्दी जमवलेला होता; भाजपने केवळ राहुल गांधी यांच्या कार्यक्रमाची कॉपी केली आहे, असा थेट आरोप रोहित पवार यांनी नागपूर येथे पत्रकारांशी बोलताना केला.
राहुल गांधींच्या कार्यक्रमात तरुण स्वतःहून आले होते, तर मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात गर्दी जमवण्यासाठी क्रिकेटपटू तिलक वर्मा आणि ४ हजार ढोल वादकांना बोलावण्यात आले होते, असे सांगत वेगवेगळ्या स्पर्धा घेऊन बक्षीस देण्यासाठी मुलांना बोलावायचे आणि त्याच व्यासपीठावर जेन झीशी संवाद दाखवायचा, मग स्वतंत्र कार्यक्रम का घेतला नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
संवाद लोकांमध्ये जाऊन होतो, बंदिस्त हॉलमध्ये आधीच ठरवलेले प्रश्न आणि उत्तरे देऊन संवाद होत नाही. आम्हाला तुमच्या मनाची बात नको, तर जनाची बात ऐकायची आहे, असा टोला लगावतानाच त्यांनी नागपूरमधील बिघडलेल्या कायदा व सुव्यवस्थेवरही बोट ठेवले.
मागील अवघ्या तीन महिन्यांत नागपूर शहरात तब्बल ३२ खून झाले असून हे थेट राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांचे शहर आहे, अशा परिस्थितीत गृहमंत्री नेमके काय करत आहेत असा थेट सवाल त्यांनी केला. मुख्यमंत्र्यांना जर लोकांशी संवाद साधायचाच होता, तर नागपुरातील सामान्य जनतेने त्यांना शहरातील गुन्हेगारीबद्दल विचारले असते तर ते अधिक संयुक्तिक झाले असते, असेही ते म्हणाले.
दरम्यान, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकीकरणाच्या चर्चांवर पूर्णविराम देत आमच्यात एकीकरणाबाबत कसलीही चर्चा सुरू नसून पवार साहेबांनी आपण एकत्र जाणार नाही हे आधीच स्पष्ट केले आहे, असे रोहित पवार म्हणाले.
तसेच खासदार सुप्रिया सुळे किंवा इतर नेते मुख्यमंत्री किंवा पंतप्रधानांना भेटतात, ती राज्यातील सामान्य जनतेच्या कामांसाठी घेतलेली भेट असते; खासदार भेटले म्हणजे आम्ही एनडीएमध्ये जात आहोत असा त्याचा अजिबात अर्थ होत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.








