Chandrapur’s Achievements Honoured by the President of Mauritius; MLA Sudhir Mungantiwar and Smt. Sapna Mungantiwar Receive the ‘Global Iconic Power Couple Award 2026 : लोकसेवा, सामाजिक बांधिलकी आणि नेतृत्वाचा आंतरराष्ट्रीय मंचावर गौरव; चंद्रपूरचा मान जागतिक पटलावर उंचावला
Chandrapur : चंद्रपूरच्या कर्तृत्वाची पताका आता थेट आंतरराष्ट्रीय पटलावर फडकली आहे. महाराष्ट्राचे माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. सपना मुनगंटीवार यांना ‘ग्लोबल आयकॉनिक पॉवर कपल अवॉर्ड २०२६’ या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने मॉरिशस येथे सन्मानित करण्यात आले. लोकमत वन वर्ल्ड समिट अँड अवॉर्ड्स मॉरिशस २०२६ या भव्य आंतरराष्ट्रीय सोहळ्यात मुनगंटीवार दाम्पत्याच्या लोकसेवा, सामाजिक बांधिलकी, नेतृत्व आणि समाजहितासाठीच्या योगदानाची दखल घेत हा बहुमान प्रदान करण्यात आला.
मॉरिशसचे राष्ट्रपती महामहिम श्री. धरमबीर गोखूल आणि त्यांच्या पत्नी श्रीमती ब्रिंदा गोखूल यांच्या शुभहस्ते, तसेच लोकमत मीडिया समूहाचे अध्यक्ष डॉ. विजय दर्डा, मॉरिशसचे कृषी-उद्योग, अन्नसुरक्षा, ब्लू इकॉनॉमी व मत्स्यव्यवसाय मंत्री मा. अर्विन बूलेल, सुप्रसिद्ध अभिनेत्री चित्रांगदा सिंह यांच्यासह अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
आ. सुधीर मुनगंटीवार यांनी महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात आपल्या कार्यकर्तृत्वाची वेगळी आणि प्रभावी छाप उमटवली आहे. महाराष्ट्राचे अर्थमंत्री म्हणून राज्याच्या आर्थिक विकासाला दिशा देतानाच चंद्रपूरच्या विकासासाठी सातत्याने पाठपुरावा, लोकहिताचे प्रश्न प्रभावीपणे मांडणे आणि विकासाच्या मुद्द्यांना प्राधान्य देणे, यामुळे त्यांनी राज्याच्या राजकारणात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. प्रदीर्घ राजकीय अनुभव, अभ्यासपूर्ण भूमिका, विकासाची दूरदृष्टी आणि जनतेशी असलेली नाळ यामुळे त्यांच्या कार्याचा ठसा महाराष्ट्राच्या पलीकडेही उमटला आहे.
तर सौ. सपना मुनगंटीवार यांनी कुटुंबाची जबाबदारी समर्थपणे सांभाळतानाच सामाजिक, सांस्कृतिक आणि सेवाभावी क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिले आहे. तिरुपती बालाजी देवस्थानच्या विश्वस्त मंडळावर महाराष्ट्रातून नियुक्त झालेल्या पहिल्या महिला विश्वस्त म्हणून त्यांनी महत्त्वाची जबाबदारी सांभाळली. त्यांनी धार्मिक, सामाजिक आणि सेवाभावी क्षेत्रातही उल्लेखनीय योगदान दिले. कन्यका महिला मंडळाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण, गरजू व वंचित घटकांना मदत, शैक्षणिक तसेच सांस्कृतिक उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे.सौ. सपना मुनगंटीवार यांच्या सामाजिक कार्यात संवेदनशीलता, सेवाभाव आणि महिला सक्षमीकरणाला विशेष महत्त्व राहिले आहे. समाजातील गरजू घटकांसाठी विविध उपक्रम राबविताना त्यांनी सामाजिक बांधिलकी जपली. त्यांच्या कार्याची दखल विविध स्तरांवर घेतली गेली असून, आता आंतरराष्ट्रीय मंचावर ‘ग्लोबल आयकॉनिक पॉवर कपल’ म्हणून झालेला गौरव त्यांच्या सामाजिक वाटचालीला मिळालेली महत्त्वपूर्ण मान्यता ठरली आहे.
मुनगंटीवार दाम्पत्याला मिळालेला हा पुरस्कार केवळ वैयक्तिक सन्मान नसून, लोकसेवा आणि सामाजिक बांधिलकीच्या त्यांच्या संयुक्त वाटचालीला मिळालेली जागतिक मान्यता आहे. आ. सुधीर मुनगंटीवार यांचे सार्वजनिक जीवनातील योगदान आणि सौ. सपना मुनगंटीवार यांचे सामाजिक व सेवाभावी कार्य यांचा गौरव ‘पॉवर कपल’ म्हणून या पुरस्काराच्या माध्यमातून करण्यात आला आहे.
चंद्रपूरच्या मातीतून उभे राहिलेले हे नेतृत्व मॉरिशसच्या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर सन्मानित होणे हा जिल्ह्यातील नागरिकांसाठी अभिमानाचा क्षण ठरला आहे. चंद्रपूरपासून मॉरिशसपर्यंत पोहोचलेला हा सन्मान म्हणजे लोकसेवेच्या कर्तृत्वावर उमटलेली जागतिक मोहोर असून, चंद्रपूरच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा रोवणारा क्षण आहे.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर आ. सुधीर मुनगंटीवार म्हणाले, माझा आणि माझ्या पत्नीचा ‘ग्लोबल आयकॉनिक पॉवर कपल अवॉर्ड २०२६’ने झालेला सन्मान हा आमच्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. हा पुरस्कार आमच्या कार्याचा आणि चंद्रपूरच्या जनतेने दिलेल्या प्रेमाचा गौरव आहे. हा सन्मान चंद्रपूर आणि महाराष्ट्राला समर्पित करतो.समाजसेवा, लोकहित आणि सामाजिक बांधिलकीच्या क्षेत्रात आजवर केलेल्या कार्याची दखल घेत मला आणि माझी पत्नी सौ. सपना मुनगंटीवार यांना लोकमत समूहातर्फे ‘Global Iconic Power Couple Award 2026’ या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने मॉरिशस येथे सन्मानित करण्यात आले. जनसेवेच्या वाटचालीवर उमटलेली ही जागतिक मान्यतेची मोहोर आम्हा दोघांसाठी अभिमानाची, आनंदाची आणि नव्या उमेदीची प्रेरणा आहे,असेही त्यांनी सांगितले. हा सन्मान केवळ आमचा नसून, आमच्यावर विश्वास ठेवणाऱ्या जनतेचा, सहकाऱ्यांचा आणि समाजहितासाठी निःस्वार्थ भावनेने झटणाऱ्या प्रत्येकाचा आहे,अशी भावना व्यक्त करत आ. मुनगंटीवार यांनी या बहुमानासाठी लोकमत समूहाचे मनःपूर्वक आभार मानले.







