व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Harshvardhan Sapkal : एमपीएससी औषध निरीक्षक परीक्षेतील घोटाळ्यावर काँग्रेस आक्रमक

Harshvardhan Sapkal : एमपीएससी औषध निरीक्षक परीक्षेतील घोटाळ्यावर काँग्रेस आक्रमक

mpsc-drug-inspector-exam-paper-leak-harshwardhan-sapkal-congress-bjp-mahayuti : हर्षवर्धन सपकाळ यांचा भाजपवर थेट हल्लाबोल

Mumbai : महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षांमधील कथित गैरप्रकार आणि पेपरफुटीच्या घटनांवरून काँग्रेसने महायुती सरकारवर पुन्हा जोरदार हल्लाबोल केला आहे. मध्य प्रदेशातील कुख्यात ‘व्यापमं’ घोटाळ्याची पुनरावृत्ती आता महाराष्ट्रात होत असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. महायुती सरकारने राज्यातील तरुणांच्या स्वप्नांवर बुलडोझर फिरवला असल्याची टीका करत, परीक्षा व्यवस्थेतील गैरप्रकारांसाठी सरकारला जबाबदार धरले आहे.

NEET, TET, तलाठी आणि CBSE परीक्षांनंतर आता MPSCकडून घेण्यात आलेल्या औषध निरीक्षक (Drug Inspector) पदाच्या परीक्षेतील पेपरफुटीचे प्रकरण समोर आले आहे. विद्यार्थ्यांनी सुरुवातीपासून तक्रारी करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आणि गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली. त्यानंतर गैरप्रकार उघडकीस आल्यानंतर MPSCला संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द करून फेरपरीक्षा घेण्याचा निर्णय घ्यावा लागल्याचा दावा सपकाळ यांनी केला.

MPSCकडून २२ मार्च २०२६ रोजी औषध निरीक्षक पदासाठी परीक्षा घेण्यात आली होती. परीक्षेचा पेपर फुटल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी सुरुवातीपासूनच केली होती. मात्र, या तक्रारींची गांभीर्याने दखल घेण्याऐवजी MPSC आणि राज्य सरकारने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. त्यानंतर ४८८ उमेदवारांची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला. परीक्षा प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असतानाही गुणवत्ता यादी जाहीर का करण्यात आली, असा सवाल आता काँग्रेसकडून उपस्थित केला जात आहे.

पुण्यात आयोजित ‘छात्रों की गूंज’ या कार्यक्रमात विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासमोर एका पीडित तरुणीने या परीक्षेतील कथित गैरप्रकाराचा मुद्दा मांडला होता. विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हा विषय चर्चेत आला होता. अखेर पोलीस तपासात पेपरफुटी सिद्ध झाल्याचा दावा करत MPSCला संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द करून फेरपरीक्षा घेण्याची वेळ आल्याचे सपकाळ यांनी म्हटले आहे. घोटाळ्याची तक्रार सुरुवातीपासून होत असताना भरती प्रक्रिया पुढे का रेटण्यात आली, असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.

Nepal Floods : नेपाळमध्ये महापूर; शेकडो परदेशी नागरिक बेपत्ता, १०५ भारतीय पर्यटकांचा समावेश

MPSC ही स्वायत्त संस्था असल्याचे सांगून सरकार आपली जबाबदारी झटकू शकत नाही, असे हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्ट केले. परीक्षा व्यवस्थेतील गैरप्रकारांमुळे हजारो विद्यार्थ्यांचे भवितव्य प्रभावित होत असताना सरकार आणि संबंधित यंत्रणांनी याची जबाबदारी स्वीकारणे गरजेचे आहे, अशी भूमिका त्यांनी मांडली. MPSCच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत सपकाळ यांनी ‘MPSCच्या कार्यालयाला टाळे ठोकण्याची वेळ आली आहे’, अशी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. विद्यार्थ्यांच्या तक्रारींकडे वेळेत लक्ष दिले असते, तर भरती प्रक्रिया रद्द करण्याची वेळ आली नसती, असा आरोपही त्यांनी केला.

परीक्षांमधील गैरप्रकारांमुळे प्रामाणिकपणे तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. वर्षानुवर्षे अभ्यास करून परीक्षा देणाऱ्या तरुणांना पेपरफुटी आणि गैरप्रकारांमुळे पुन्हा त्याच परीक्षेला सामोरे जावे लागते. त्यामुळे त्यांचा वेळ, पैसा आणि मेहनत वाया जाते. ‘एकही परीक्षा पारदर्शकपणे घेता येत नसेल तर सरकारने विद्यार्थ्यांना काय उत्तर द्यायचे?’, असा सवाल करत सपकाळ यांनी महायुती सरकारवर टीका केली. परीक्षांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणीही त्यांनी केली.

दरम्यान, परीक्षा घोटाळ्यांसोबतच राज्य सरकारकडून आंदोलनांवर लादण्यात येणाऱ्या निर्बंधांवरही काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. लोकशाहीमध्ये संविधानाने नागरिकांना दिलेला आंदोलनाचा अधिकार सरकार हिरावून घेण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप सपकाळ यांनी केला. मुंबईत केवळ आझाद मैदानावर, तेही शासकीय कामकाजाच्या दिवशी सकाळी ९ ते संध्याकाळी ६ या वेळेतच आंदोलन करण्याचे नियम लादण्यात आल्याचे सांगत काँग्रेसने या निर्बंधांना विरोध केला आहे. विरोधक आणि तरुणांचा आवाज दाबण्यासाठी हे नियम लादले जात असल्याचा आरोप सपकाळ यांनी केला असून, हे नियम तात्काळ रद्द करण्याची मागणी त्यांनी केली.

Mpsc Paper leak : एमपीएससीचा पेपर प्रेमप्रकरणातून फुटला ? ‘लव्हस्टोरी’ने यंत्रणेलाच हादरवले

परीक्षांमधील गैरप्रकार आणि तरुणांच्या प्रश्नांवर सरकारने तातडीने भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी सुरू असलेला खेळ सरकारने थांबवला नाही, तर अन्यायग्रस्त युवा वर्ग मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरेल, असा इशारा हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला. परीक्षा पारदर्शकपणे घेणे, पेपरफुटीला आळा घालणे आणि दोषींवर कठोर कारवाई करणे, यासाठी सरकारने ठोस पावले उचलली नाहीत तर काँग्रेस या मुद्द्यावर आक्रमक आंदोलन उभारणार असल्याचे संकेतही त्यांनी दिले आहेत.

error: Content is protected !!