व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Mpsc Paper leak : एमपीएससीचा पेपर प्रेमप्रकरणातून फुटला ? ‘लव्हस्टोरी’ने यंत्रणेलाच हादरवले

Mpsc Paper leak : एमपीएससीचा पेपर प्रेमप्रकरणातून फुटला ? ‘लव्हस्टोरी’ने यंत्रणेलाच हादरवले

mpsc-fda-drug-inspector-exam-paper-leak-love-story-recruitment-cancelled-2026 : औषध निरीक्षक परीक्षेची संपूर्ण भरती प्रक्रिया अखेर रद्द

Mumbai : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औषध निरीक्षक, गट-ब पदाच्या भरती प्रक्रियेला पेपरफुटीच्या संशयामुळे मोठा धक्का बसला आहे. अन्न व औषध प्रशासनातील औषध निरीक्षक पदासाठी घेण्यात आलेली संपूर्ण भरती प्रक्रिया महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. २२ मार्च २०२६ रोजी झालेल्या चाळणी परीक्षेत गैरप्रकार झाल्याच्या तक्रारीनंतर मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने प्राथमिक चौकशी केली. या चौकशीत एका उमेदवाराला प्रश्नसंच मिळाल्याचे आणि त्याचा त्याला लाभ झाल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे.

या प्रकरणाला आता कथित प्रेमप्रकरणाची धक्कादायक किनार असल्याची माहिती समोर येत आहे. प्राथमिक तपासात एका उमेदवाराने आयोगातील एका कनिष्ठ कर्मचाऱ्याशी कथितरित्या संपर्क साधून प्रश्नपत्रिका मिळवल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे, प्रश्नसंच केवळ एका उमेदवारापर्यंत पोहोचल्याचा प्राथमिक निष्कर्ष असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे एका कथित प्रेमसंबंधातून सुरू झालेल्या गैरप्रकाराचा फटका मात्र परीक्षेला बसलेल्या सर्व उमेदवारांना सहन करावा लागला आहे.

एमपीएससीच्या या परीक्षेतील पेपरफुटीचा प्रकार इतर पेपरफुटीच्या घटनांपेक्षा वेगळा असल्याचे तपासातून दिसून येत आहे. प्राथमिक माहितीनुसार, प्रश्नसंच मोठ्या प्रमाणावर उमेदवारांमध्ये वितरित झाल्याचे अद्याप समोर आलेले नाही. एका उमेदवाराला त्याचा लाभ मिळाल्याचे तपासात आढळून आल्याने आयोगाने संपूर्ण परीक्षा प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

Restrictions On Protests : जरांगे-हाके यांच्या आंदोलनापूर्वी गृह विभागाचे मोठे निर्बंध

या कथित गैरप्रकारामागे एका उमेदवाराचे आणि आयोगातील कनिष्ठ कर्मचाऱ्याचे संबंध असल्याची माहिती तपासातून पुढे आल्याचे सांगितले जात आहे. मात्र, या प्रकरणातील नेमके संबंध, प्रश्नसंच कशा पद्धतीने बाहेर गेला आणि त्यामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास मुंबई पोलिसांकडून सुरू आहे.

एमपीएससीच्या परीक्षेची तयारी करण्यासाठी उमेदवार अनेक महिने मेहनत घेतात. अशा परिस्थितीत केवळ एका उमेदवाराला कथितरित्या प्रश्नसंच मिळाल्याचा संशय असतानाही संपूर्ण परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे प्रामाणिकपणे परीक्षा देणाऱ्या उमेदवारांमध्ये नाराजी निर्माण होण्याची शक्यता आहे.

या परीक्षेचा निकाल आधीच जाहीर झाला होता. त्यानंतर मुलाखतीची प्रक्रियाही पूर्ण करण्यात आली होती. त्यामुळे भरती प्रक्रियेचा मोठा टप्पा पार पडलेला असताना पेपरफुटीच्या संशयामुळे संपूर्ण प्रक्रिया पुन्हा सुरुवातीपासून करावी लागणार आहे.

औषध निरीक्षक, गट-ब पदासाठीची चाळणी परीक्षा २२ मार्च २०२६ रोजी राज्यातील सहा विभागीय मुख्यालयांच्या ठिकाणी ऑफलाइन पद्धतीने घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल १२ जून २०२६ रोजी जाहीर करण्यात आला. चाळणी परीक्षेनंतर मुलाखतीसाठी ५०६ उमेदवार पात्र ठरले होते.

यापैकी ४८८ उमेदवारांच्या मुलाखती १ ते २२ जुलै २०२६ या कालावधीत घेण्यात आल्या. २२ जुलै रोजी मुलाखती पूर्ण झाल्यानंतर औषध निरीक्षक पदासाठी पात्र ठरलेल्या ४८५ आणि अपात्र ठरलेल्या तीन अशा एकूण ४८८ उमेदवारांची तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली होती.

Mla Report Card : आमदारांच्या प्रगतीपुस्तकात काँग्रेसचा दबदबा

मात्र, त्यानंतर परीक्षेतील गैरप्रकाराच्या तक्रारी आणि मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेच्या प्राथमिक चौकशीत समोर आलेल्या बाबींच्या पार्श्वभूमीवर आयोगाने कठोर निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने औषध निरीक्षक, गट-ब या पदासाठी फेरपरीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. महत्त्वाचे म्हणजे, यापूर्वी या भरती प्रक्रियेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता राहणार नाही. तसेच फेरपरीक्षेसाठी कोणतेही परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही.

फेरपरीक्षेची तारीख स्वतंत्र प्रसिद्धिपत्रकाद्वारे जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे आता हजारो इच्छुक उमेदवारांचे लक्ष आयोगाच्या पुढील अधिकृत घोषणेकडे लागले आहे या भरती प्रक्रियेची बहुतांश प्रक्रिया विद्यमान आयोगाचे अध्यक्ष रुजू होण्यापूर्वीच सुरू झाली होती, अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे सध्याच्या आयोगाच्या नेतृत्वाशी या परीक्षेच्या मूळ प्रक्रियेचा थेट संबंध नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, परीक्षेच्या प्रक्रियेत गैरप्रकार झाल्याचा संशय निर्माण झाल्यानंतर आयोगाने उमेदवारांच्या विश्वासार्हतेला प्राधान्य देत संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द करून फेरपरीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे.

Nagpur crime : मुख्यमंत्र्यांच्या शहरात काँग्रेस नगरसेवकाच्या घरावर गोळीबार !

एमपीएससीच्या औषध निरीक्षक परीक्षेतील पेपरफुटीच्या प्रकरणाला कथित प्रेमसंबंधाची किनार असल्याची माहिती समोर आल्याने या प्रकरणाची चर्चा अधिक रंगली आहे. एका उमेदवाराला प्रश्नसंच मिळवून देण्यासाठी आयोगातील कनिष्ठ स्तरावरील कर्मचाऱ्याची मदत घेण्यात आल्याची प्राथमिक माहिती असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, या प्रकरणातील आरोप आणि कथित प्रेमसंबंधांबाबत पोलिसांच्या पुढील तपासातून प्रश्नसंच नेमका कसा बाहेर गेला, त्यामागे कोणाचा सहभाग होता आणि या प्रकरणात आणखी कोणी सहभागी आहे का, याचा उलगडा होणार आहे.

दरम्यान, एका कथित गैरप्रकारामुळे संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द झाल्याने प्रामाणिकपणे परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना पुन्हा परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे. आता फेरपरीक्षा पारदर्शक आणि कोणत्याही गैरप्रकाराला वाव न देता पार पडावी, अशीच अपेक्षा उमेदवारांकडून व्यक्त होत आहे.

_:’

error: Content is protected !!