gunaratna-sadavarte-manoj-jarange-patil-devendra-fadnavis-maratha-reservation-protest : गुणरत्न सदावर्तेंचा गंभीर आरोप, फडणवीसांना लक्ष्य केल्याचा दावा
Mumbai : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा उपोषणाला बसण्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे शनिवारपासून मनोज जरांगे पाटील आमरण उपोषणाला सुरुवात करणार आहेत. त्यापूर्वीच ॲप ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी पत्रकार परिषद घेत जरांगे यांच्या आंदोलनावर जोरदार टीका केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बिगरमराठा समाजातील असल्याने जातीय आकसातून त्यांना लक्ष्य करण्यासाठी हे आंदोलन उभे केले जात असल्याचा गंभीर आरोप सदावर्ते यांनी केला.
मनोज जरांगे पाटील यांना अंतरवाली सराटी किंवा मुंबईत आंदोलन करण्याची परवानगी देऊ नये, अशी मागणीही गुणरत्न सदावर्ते यांनी केली. पोलिसांनी या प्रकरणात मंत्रालयातील कोणाच्या निर्देशांची वाट न पाहता कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने कठोर भूमिका घ्यावी, असेही त्यांनी म्हटले. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला राजकीय व्यक्तींचा सक्रिय पाठिंबा असल्याचा दावा सदावर्ते यांनी केला. माजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मराठा समाजातील अनेक नेते या आंदोलनामध्ये सक्रिय असल्याचे त्यांनी सांगितले.
सत्तेतील तसेच सत्तेबाहेरील मराठा नेत्यांचा या आंदोलनाला थेट पाठिंबा असल्याचा आरोप करत सदावर्ते यांनी हे आंदोलन केवळ आरक्षणाच्या मागणीपुरते मर्यादित नसल्याचे म्हटले. त्यांच्या मते, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जातीय आकसातून लक्ष्य केले जात आहे. गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर वैयक्तिक आणि राजकीय स्वरूपाची टीका करत त्यांना एका राजकीय खेळीतील प्यादा असल्याचे म्हटले. जरांगे हे एकनाथ शिंदे यांचे सेवक असल्याचा आरोपही त्यांनी केला.
मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाला लक्ष्य करण्याची भाषा केली जात असतानाही एकनाथ शिंदे यांच्याकडून त्याचा पुरेसा निषेध होत नसल्याचे सदावर्ते म्हणाले. सत्तेतील इतर काही मंत्रीही या विषयावर मवाळ भूमिका घेत असल्याचा आरोप त्यांनी केला. आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला अस्थिर करण्याची भाषा योग्य नसल्याचे सांगत सदावर्ते यांनी आंदोलनाच्या संभाव्य परिणामांबाबत पोलिसांनी सावध राहण्याची मागणी केली. रेल्वे मार्ग आणि विमानतळासारख्या महत्त्वाच्या ठिकाणांना लक्ष्य करण्यासंदर्भातील वक्तव्ये तसेच महत्त्वाच्या व्यक्तींच्या घरांना लक्ष्य करण्याची भाषा ही गंभीर असल्याचे त्यांनी नमूद केले.
मुंबईतील आझाद मैदान परिसरात मोठ्या संख्येने आंदोलक जमल्यास कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असा दावा करत मराठा आंदोलनाला मोठ्या संख्येने लोक उपस्थित राहण्याची शक्यता असल्याचे सदावर्ते यांनी सांगितले. त्यामुळे आंदोलनाला परवानगी देताना पोलिसांनी परिस्थितीचा गांभीर्याने विचार करावा, अशी मागणी त्यांनी केली. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना सदावर्ते यांनी आपल्याला अनेक मराठा समाजातील व्यक्तींचे फोन येत असल्याचा दावा केला. मराठा समाजातील काही लोकांना मराठा आरक्षणाऐवजी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी असलेल्या ईडब्ल्यूएस आरक्षणाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
Nepal Flood : नेपाळमध्ये अडकलेल्या १०६ भाविकांचा महाराष्ट्राकडे परतीचा प्रवास सुरू!
‘पाटील’ या संबोधनावरूनही त्यांनी मनोज जरांगे यांच्यावर टीका केली. संविधानात ‘पाटील’ नावाचे कोणतेही पद नसल्याचे सांगत गावपातळीवर पाटील ही संज्ञा विविध समाजातील व्यक्तींसाठी वापरली जाऊ शकते, असा दावा त्यांनी केला. दरम्यान, मनोज जरांगे पाटील शनिवारपासून अंतरवाली सराटी येथे त्यांच्या ११व्या आमरण उपोषणाला सुरुवात करणार आहेत. सकाळी दहा वाजता पत्रकार परिषद घेऊन उपोषणाला सुरुवात करण्याची त्यांची तयारी आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून त्यांना कायदा-सुव्यवस्था आणि आंदोलनासंदर्भातील नियमांचे पालन करण्याबाबत प्रतिबंधात्मक नोटीसही देण्यात आली आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासह विविध मागण्या सरकारसमोर ठेवल्या आहेत. त्यामध्ये कुणबी नोंदींच्या आधारे प्रमाणपत्र आणि वैधता देणे, हैदराबाद गॅझेटमधील नोंदींच्या आधारे मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र व वैधता देणे, सातारा-कोल्हापूर गॅझेटियरसंदर्भात शासन निर्णय काढणे, आंदोलनादरम्यान दाखल झालेले गुन्हे मागे घेणे आणि स्वतंत्र कुणबी मंत्रालयाची स्थापना करणे या मागण्यांचा समावेश आहे. एकीकडे मनोज जरांगे पाटील आपल्या मागण्यांसाठी पुन्हा उपोषणाला बसत असताना दुसरीकडे गुणरत्न सदावर्ते यांनी आंदोलनाच्या राजकीय हेतूंवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यामुळे आगामी काळात सरकारची भूमिका काय राहणार आणि या आंदोलनाला राज्य सरकार कशा पद्धतीने सामोरे जाणार, याकडे आता महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
___








