dhananjay-munde-gym-video-instagram-post-political-comeback-maharashtra : धनंजय मुंडेंच्या नव्या व्हिडीओची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा
Mumbai : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे गेल्या काही काळापासून सक्रिय राजकारणापासून दूर असताना त्यांचा सोशल मीडियावरील एक व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. धनंजय मुंडे यांनी आपल्या इन्स्टाग्राम खात्यावर जीममध्ये व्यायाम करतानाचा व्हिडीओ शेअर केला असून, त्यासोबत लिहिलेल्या कवितेच्या ओळींमुळे त्यांच्या पोस्टकडे राजकीय संकेत म्हणून पाहिले जात आहे.
या व्हिडीओमध्ये धनंजय मुंडे व्यायाम करताना दिसत असून, गेल्या काही महिन्यांत त्यांनी आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष दिल्याचे दिसून येते. त्यांच्या फिटनेस ट्रान्सफॉर्मेशनचीही सोशल मीडियावर चर्चा होत आहे. मात्र, व्हिडीओपेक्षा त्यासोबतच्या कॅप्शनने अधिक लक्ष वेधून घेतले आहे. “काटे खोलवर रुतले आहेत, तरी पाऊल पुढे टाकतो आहे… भेगाळलेले पाय आणि घायाळ मन; अजूनही धैर्य टिकवून आहे… निंदा-दूषणे आता न भिडती, अडखळत मार्ग काढतोच आहे… हरवण्याची आता बिशाद कुणाची… स्वतःशी सुद्धा लढतो आहे…” अशा आशयाच्या ओळी मुंडे यांनी पोस्टमध्ये लिहिल्या आहेत.
या शब्दांमधून धनंजय मुंडे यांनी गेल्या काही काळातील राजकीय अडचणी, टीका आणि आरोपांनंतरही आपण खचलेलो नसल्याचा संदेश दिला आहे का, याबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्क सुरू झाले आहेत. विशेषतः “निंदा-दूषणे आता न भिडती” आणि “स्वतःशी सुद्धा लढतो आहे” या ओळींकडे त्यांच्या राजकीय पुनरागमनाच्या पार्श्वभूमीवर पाहिले जात आहे. बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर धनंजय मुंडे यांच्यावर मोठ्या प्रमाणात राजकीय टीका झाली होती. या प्रकरणात त्यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांचे नाव चर्चेत आल्यानंतर मुंडे यांच्या राजकीय भूमिकेवरही प्रश्न उपस्थित झाले. या पार्श्वभूमीवर त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.
Vhp Navratri Guidelines : दांडियाच्या मैदानात ‘धर्माचा एन्ट्री पास’! मुस्लिमांना प्रवेशबंदी
यानंतर मुंडे यांच्या मंत्रिमंडळातील पुनरागमनाबाबत वेळोवेळी चर्चा झाली. मात्र, त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही. अलीकडेच त्यांनी सक्रिय राजकारणात परतण्याचे संकेत दिले होते. बीड दौऱ्याच्या वेळी पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या प्रसारमाध्यमांशी संवादाच्या मुद्द्यावरूनही मुंडे चर्चेत आले होते. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी त्यांना पक्षाच्या शिस्तीबाबत अप्रत्यक्षपणे सुनावले होते. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांचा जीममधील व्हिडीओ आणि त्याला दिलेले काव्यात्मक कॅप्शन महत्त्वाचे मानले जात आहे. त्यांनी थेट कोणतेही राजकीय वक्तव्य केलेले नसले तरी “अजूनही धैर्य टिकवून आहे” आणि “स्वतःशी सुद्धा लढतो आहे” या शब्दांमधून भविष्यातील राजकीय वाटचालीचे संकेत मिळत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे मुंडे यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून, त्यांच्या पुढील राजकीय भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.








