व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home ताज्या बातम्या Manoj Jarange : मराठा आरक्षणावरून राजकीय रणकंदन! मनोज जरांगे यांचा शिंदे सेनेवर...

Manoj Jarange : मराठा आरक्षणावरून राजकीय रणकंदन! मनोज जरांगे यांचा शिंदे सेनेवर गंभीर आरोप

maratha-reservation-manoj-jarange-shinde-sena-allegations-government-meeting : दबाव वाढत असताना आज सरकारची आज तातडीची बैठक

Mumbai : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे यांनी महायुती सरकारविरोधातील संघर्ष आणखी तीव्र केला आहे. शिंदे गटाच्या मंत्र्यांवर आणि प्रवक्त्यांवर गंभीर आरोप करत जरांगे यांनी नवा राजकीय मुद्दा उपस्थित केला आहे. मुंबईत आंदोलन करणाऱ्या मराठा समाजातील उमेदवारांवर हल्ला करण्याचा कट शिंदे सेनेतील मंत्री आणि प्रवक्ते रचत असल्याचा खळबळजनक दावा जरांगे यांनी केला. या आरोपांमुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा राजकीयदृष्ट्या तापण्याची शक्यता आहे.

मनोज जरांगे यांचे उपोषण आज दहाव्या दिवशीही सुरू आहे. प्रकृती खालावली असतानाही त्यांनी वैद्यकीय उपचार घेण्यास नकार दिला आहे. मराठा समाजाच्या जात प्रमाणपत्राच्या प्रश्नावर अंतिम आणि ठोस निर्णय घेण्यासाठी जरांगे यांनी महायुती सरकारला १२ सप्टेंबरपर्यंतची अंतिम मुदत दिली आहे.

Congress Protest : एमपीएससीच्या अनागोंदी कारभाराविरोधात काँग्रेस आक्रमक

जरांगे यांच्या आंदोलनामुळे सरकारवरील दबाव वाढत असतानाच राज्य सरकारने आज या प्रश्नावर तातडीची उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर चर्चा होणार आहे. त्यामुळे १२ सप्टेंबरच्या अल्टिमेटमपूर्वी सरकार कोणता निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.दरम्यान, सरकार जाणीवपूर्वक निर्णय घेण्यास विलंब करत असल्याचा आरोप जरांगे यांनी केला आहे. या प्रकरणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात मिलिभगत असल्याचा थेट दावा त्यांनी केला.

मुंबईतील आंदोलकांनी शांतता राखावी, असे आवाहन करतानाच शिंदे सेनेकडून घातपात होण्याची भीती असल्याचेही जरांगे यांनी म्हटले आहे. त्यामुळे त्यांच्या आरोपांवरून सत्ताधारी आणि मराठा आंदोलन यांच्यातील संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हे आहेत. आंदोलनाच्या सुरुवातीपासूनच मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेवर निशाणा साधला आहे. आमच्याच बळावर शिंदे सेनेचे खासदार आणि आमदार निवडून आले, मात्र त्याची परतफेड मराठा समाजाच्या उमेदवारांचे कुणबी जात प्रमाणपत्र अवैध ठरवून करण्यात आल्याचा आरोप जरांगे यांनी यापूर्वी केला होता.

Student Protest : नीट परीक्षेच्या धर्तीवर एमपीएससीविरोधात विरोधक आक्रमक

आगामी निवडणुकांमध्ये शिंदे सेनेच्या उमेदवारांना पाडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. परभणी येथील शिंदे सेनेचा शेतकरी मेळावा उधळून लावण्याचा इशारा यापूर्वी देण्यात आला होता. त्यानंतर शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या मेळाव्यात घोषणाबाजी झाल्याने या संघर्षाची तीव्रता पुन्हा अधोरेखित झाली. मराठा आरक्षणाचा प्रश्न आणि त्यावरून सुरू असलेला राजकीय संघर्ष आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. १२ सप्टेंबरच्या अल्टिमेटमपूर्वी सरकार मराठा समाजाच्या मागण्यांवर काय निर्णय घेणार, तसेच जरांगे यांच्या आरोपांना सत्ताधारी पक्षाकडून काय प्रत्युत्तर दिले जाणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!