Sanjay Gaikwad in controversy over remarks about Shweta Mahale’s rally : श्वेता महाले यांच्या रॅलीवरून टिप्पणी; ‘त्या माझ्या ताईसारख्या’, असे स्पष्टीकरण देत सारवासारव
Buldhana शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी भाजपच्या आमदार श्वेता महाले यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात नव्या वादाला तोंड फुटले आहे. महाले यांनी एका रॅलीदरम्यान ‘बाप तो बाप रहेगा’ या गाण्यावर ठेका धरत धनुष्यबाण ताणून दाखवला होता. या रॅलीचा संदर्भ देताना गायकवाड यांनी केलेल्या टिप्पणीची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
बुलढाण्यात माध्यमांशी संवाद साधताना संजय गायकवाड म्हणाले, ‘बाप तो बाप रहेगा’ हे एखाद्या पुरुषाने म्हटले तर समजू शकते. मात्र, एखाद्या महिलेने स्वतःला ‘बाप’ म्हणणे योग्य आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. याच मुद्द्यावर बोलताना त्यांनी, “पण बाई, बापासारखं शरीर कुठून आणणार?” अशी टिप्पणी केली.
या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात नव्या प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे. राजकारणात कोणाची ताकद किती आहे, हे योग्य वेळी दाखवून देऊ, असा इशाराही गायकवाड यांनी दिला.
‘त्या माझ्या ताईसारख्या’
श्वेता महाले यांनी आपल्याला समोरासमोर येण्याचे आव्हान दिल्याबाबतही गायकवाड यांनी भाष्य केले. महाले या महिला आमदार असून त्या आपल्यासाठी बहिणीसारख्या आणि ताईसारख्या आहेत, असे त्यांनी सांगितले.
यापूर्वी बँकेच्या निवडणुकीत आम्ही दोघेही एकत्र काम केले होते. त्यावेळी एका ताटात आणि एका चमच्याने जेवलो असल्याचेही गायकवाड यांनी नमूद केले. त्यामुळे आता एकमेकांसमोर येण्याचा किंवा वैयक्तिक संघर्ष करण्याचा प्रश्नच नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शक्तिप्रदर्शनावरूनही टोलेबाजी
वाढदिवसाच्या निमित्ताने दोन्ही बाजूंनी सुरू असलेल्या शक्तिप्रदर्शनावरही गायकवाड यांनी भाष्य केले. बुलढाण्यात भाजपने आपली ताकद वाढवावी आणि चिखलीमध्ये शिवसेनेने संघटन मजबूत करावे, असे ते म्हणाले. मात्र, स्थानिक पातळीवरील भाजप काँग्रेसच्या बाजूने जाऊ नये, याची काळजी घ्यावी, असा टोला त्यांनी महाले यांना लगावला.
Bacchu Kadu : वनविभागात ‘एक दिवसाचा गणपती’ बसवू; बच्चू कडूंचा इशारा
‘महायुतीमध्ये संघर्ष नाही’
महायुतीमध्ये कोणताही मोठा संघर्ष नसल्याचा दावा संजय गायकवाड यांनी केला. महायुती एकसंघ असून काही लोक या वादाला वेगळे स्वरूप देत असल्याचे त्यांनी म्हटले. राजकारणात फारसा प्रभाव नसलेले काही लोक या वादात विनाकारण उडी घेत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.
रॅलीतील वीजपुरवठ्याच्या मुद्द्यावर स्पष्टीकरण
श्वेता महाले यांच्या रॅलीदरम्यान अचानक वीज गेल्याच्या घटनेवरूनही गायकवाड यांच्यावर आरोप झाले होते. या प्रकरणावर त्यांनी आपली बाजू स्पष्ट केली. आपल्या रॅलीचे कार्यक्रम यापूर्वीही मोठ्या प्रमाणावर झाले असून अशा गोष्टींना आपण घाबरत नसल्याचे त्यांनी सांगितले.
महाले यांच्या वाढदिवसाच्या रॅलीला उत्तर म्हणून आपण कोणताही कार्यक्रम किंवा शक्तिप्रदर्शन केलेले नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. “माझ्याकडे हरामाचा पैसा नाही. पैशांची उधळपट्टी करून कार्यक्रम करण्याची मला गरज नाही,” असे म्हणत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला.
लोकांना पैसे देऊन किंवा दबाव टाकून गर्दी जमवण्याची आपल्याला गरज नसल्याचा दावाही त्यांनी केला. शुभेच्छा मनापासून दिल्या जातात. त्यासाठी अधिकारी किंवा पोलिसांना कामाला लावून गर्दी जमवण्याची पद्धत योग्य नसल्याचा टोलाही त्यांनी लगावला.
Ravikant Tupkar : आमदारांचे वेतन-भत्ते रोखा अन् शेतकऱ्यांना मदत करा
बुलढाण्याचा कचरा चिखलीपर्यंत पोहोचल्याची टीका श्वेता महाले यांनी केली होती. या टीकेलाही संजय गायकवाड यांनी प्रत्युत्तर दिले. बुलढाणा शहरात मोठ्या प्रमाणावर विकासकामे झाली असून त्याची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात होत असल्याचा दावा त्यांनी केला.
शहरात नेमका विकास झाला आहे की कचरा वाढला आहे, हे जनतेला चांगलेच माहीत असल्याचे सांगत त्यांनी महाले यांच्या टीकेवर पलटवार केला.
दरम्यान, श्वेता महाले यांच्या रॅलीनंतर संजय गायकवाड यांनी केलेल्या वक्तव्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील महायुतीतील अंतर्गत राजकारण पुन्हा चर्चेत आले आहे. दोन्ही आमदारांकडून एकमेकांवर टीका-टोले सुरू असले तरी राज्य पातळीवर महायुती एकसंघ असल्याचा दावा गायकवाड यांनी केला आहे.








