abhijit-dipke-meets-manoj-jarange-government-warning-maratha-reservation : अभिजीत दीपकेंचा सरकारला थेट इशारा
Jalna : मराठा आरक्षणाच्या विविध मागण्यांसाठी अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांची कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी भेट घेतली. जरांगे यांच्या उपोषणाचा चौदावा दिवस सुरू असताना सरकारने त्यांच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी दीपके यांनी केली. तसेच मनोज जरांगे यांच्यावर कोणतीही कारवाई करण्याचा प्रयत्न करू नये, असा थेट इशाराही त्यांनी सरकारला दिला.
मनोज जरांगे यांच्या उपोषणाला १४ दिवस उलटले असूनही सरकारकडून त्यांची पुरेशी दखल घेतली जात नसल्याचा आरोप अभिजीत दीपके यांनी केला. लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी जनतेच्या प्रश्नांवर चर्चा करण्याऐवजी इतर कार्यक्रमांमध्ये व्यस्त असल्याची टीकाही त्यांनी केली.
‘मनोज जरांगे यांच्यासारख्या समाजसेवकाला मरण्यासाठी सोडून देणार का?’ असा सवाल करत दीपके यांनी सरकारच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली. चांगले शिक्षण आणि रोजगाराच्या संधी मिळाव्यात, या मागण्यांसाठी जरांगे उपोषण करत असल्याचे सांगत सरकारने मूलभूत सुविधा आणि रोजगार उपलब्ध करून दिले असते, तर उपोषणाची वेळच आली नसती, असेही त्यांनी म्हटले.
सरकारच्या अपयशामुळेच मनोज जरांगे यांच्यावर उपोषण करण्याची वेळ आली असल्याचा आरोप करत ग्रामीण भागातील शिक्षण आणि रोजगाराच्या परिस्थितीवरही दीपके यांनी प्रश्न उपस्थित केले. ग्रामीण भागातील सरकारी शाळा उत्तम स्थितीत आहेत आणि रोजगाराच्या पुरेशा संधी उपलब्ध आहेत, अशा एखाद्या जिल्ह्याचे नाव सरकारने सांगावे, असे आव्हान त्यांनी दिले.
सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाचा संदर्भ देत दीपके यांनी सरकारला सावध केले. दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचुक यांना आंदोलनस्थळावरून हटविल्याप्रमाणे मनोज जरांगे यांच्याबाबत कोणताही प्रयत्न करू नये, असे ते म्हणाले.
‘हा महाराष्ट्र आहे, इथे हे अजिबात चालणार नाही. मनोज जरांगे यांना हात लावला तर पूर्ण महाराष्ट्र इथे येईल,’ असा इशारा अभिजीत दीपके यांनी दिला.
Uday Samant : उदय सामंतांचा आदित्य ठाकरेंना टोला; ‘टीका करण्यापेक्षा संयम ठेवून काम करा’
सरकारने अंतरवाली सराटी येथे येऊन मनोज जरांगे यांच्या मागण्या ऐकाव्यात, अशी मागणीही त्यांनी केली. जनतेने लोकप्रतिनिधींना केवळ सत्तेचा उपभोग घेण्यासाठी नव्हे, तर जनतेची कामे आणि प्रश्न सोडवण्यासाठी निवडून दिले आहे, असा टोलाही दीपके यांनी सरकारला लगावला.








