व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Amravati district women’s hospital : डफरीन अग्निकांडात मोठी कारवाई; सार्वजनिक बांधकाम विभागातील...

Amravati district women’s hospital : डफरीन अग्निकांडात मोठी कारवाई; सार्वजनिक बांधकाम विभागातील तिघांचे निलंबन

Major action in Dufferin Hospital fire case; three Public Works Department officials suspended : उपविभागीय अभियंत्यासह तीन जणांवर कारवाई; चौकशी समितीच्या अहवालानंतर प्रशासनाचा दणका

Amravati जिल्हा स्त्री रुग्णालयातील (डफरीन) नवजात अतिदक्षता विभागात झालेल्या भीषण अग्निकांडप्रकरणी प्रशासनाने मोठी कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (विद्युत) तीन अधिकारी-कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. त्यामध्ये एका उपविभागीय अभियंत्यासह सहायक अभियंता वर्ग-२ आणि वर्ग-३ मधील एका कर्मचाऱ्याचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती आहे.

डफरीन रुग्णालयातील दुर्घटनेनंतर चौकशी समितीच्या अहवालाच्या आधारे विविध विभागांतील जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई सुरू आहे. सार्वजनिक बांधकाम विभागातील या तिघांच्या निलंबनामुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे.

जिल्हा स्त्री रुग्णालयातील एसएनसीयू विभागात २४ ऑगस्ट २०२६ रोजी पहाटेच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली होती. या दुर्घटनेत तीन नवजात बालकांचा मृत्यू झाला होता. या घटनेचे तीव्र पडसाद राज्यभर उमटल्यानंतर शासनाने राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे आयुक्त संजय काटकर यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय चौकशी समिती नियुक्त केली होती.

Shivendrasinghraje bhosle : रखडलेल्या जयस्तंभ-राजकमल उड्डाणपुलाचे काम ऑक्टोबरपासून; १३० कोटींचा निधी मंजूर

चौकशी समितीने डफरीन रुग्णालयात प्रत्यक्ष पाहणी करून शासनाला सविस्तर अहवाल सादर केला. या अहवालात विद्युत यंत्रणा, उपकरणांची देखभाल तसेच अग्निसुरक्षेच्या उपाययोजनांबाबत गंभीर त्रुटी असल्याचे नमूद करण्यात आल्याची माहिती आहे.

चौकशी अहवालात रुग्णालयातील विद्युत यंत्रणा, उपकरणांची नियमित देखभाल आणि अग्निसुरक्षा व्यवस्थेकडे दुर्लक्ष झाल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. तसेच संबंधित उपकरणांची देखभाल करणारी कंपनी आणि व्हेंटिलेटर उत्पादक कंपनीच्या भूमिकेचीही चौकशी करण्यात आल्याची माहिती आहे.

यापूर्वी या प्रकरणात आरोग्य विभागातील पाच अधिकारी व कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर आता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विद्युत शाखेतील तीन जणांवर कारवाई करण्यात आल्याने दोषींविरुद्ध कारवाईची व्याप्ती वाढली आहे.

Uddhav Thackeray Shivsena : कोरडा दुष्काळ जाहीर करा; पश्चिम विदर्भात उद्धवसेनेचे आक्रोश मोर्चे

आरोग्य विभागातील कारवाईनंतर सार्वजनिक बांधकाम विभागातील संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई कधी होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात होता. आता विद्युत विभागातील तिघांना निलंबित करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या निलंबनाचे अधिकृत लेखी आदेश उपलब्ध झाल्यानंतर त्यांच्यावरील आरोपांचे नेमके स्वरूप आणि पुढील कारवाईची दिशा स्पष्ट होणार आहे.

error: Content is protected !!