मोठ्या कारवाईत आणखी ४ अटक, आरोपींची संख्या ११ वर
Nagpur : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) औषध निरीक्षक परीक्षा पेपरफुटी प्रकरणाचा तपास आता अधिक वेगाने पुढे जात असून मुंबई गुन्हे शाखेच्या विशेष तपास पथकाने आणखी चार जणांना अटक केली आहे. यामध्ये दोन उमेदवार आणि दोन मध्यस्थांचा समावेश आहे. या कारवाईनंतर प्रकरणातील अटक केलेल्या आरोपींची संख्या ११ वर पोहोचली आहे. विशेष म्हणजे, यातील एका उमेदवाराला विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे.
गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार, साजिद संदे या उमेदवाराला सांगोला येथून, तर विजय किंगर या उमेदवाराला बुलढाणा जिल्ह्यातून ताब्यात घेण्यात आले. त्यामुळे एमपीएससीच्या या पेपरफुटी प्रकरणाचा तपास आता विदर्भातील बुलढाण्यापर्यंत पोहोचला आहे. या दोघांसह मध्यस्थ म्हणून काम केल्याचा आरोप असलेल्या संदीप खलाटे आणि भैरवनाथ कदम यांना नवी मुंबई परिसरातून अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणात यापूर्वीही गुन्हे शाखेने काही महत्त्वाच्या आरोपींना अटक केली आहे. यामध्ये अवर सचिव अभिजीत लेंडवे, एमपीएससीच्या गोपनीय कक्षात कार्यरत असलेला सहाय्यक कक्ष अधिकारी विश्वेश्वर नकाते, सहाय्यक कक्ष अधिकारी गोपाळ मराठे, कौटिल्य अकॅडमीचे संचालक प्रवीण पाटील तसेच मध्यस्थ अमृत पाटील, लोकेश उर्फ गौरव पाटील आणि उमेदवार ऋतुजा पाटील यांचा समावेश आहे.
Student Elections : महाराष्ट्रातील महाविद्यालयांत पुन्हा विद्यार्थी निवडणुकांचा मार्ग मोकळा होणार?
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने अन्न व औषध प्रशासनातील औषध निरीक्षक, गट-ब संवर्गातील १५४ पदांसाठी २२ मार्च २०२६ रोजी परीक्षा घेण्यात आली होती. राज्यातील सहा विविध परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा आयोजित करण्यात आली होती. तपासादरम्यान या परीक्षेच्या प्रश्नसंचाची गोपनीयता भंग करून तो आर्थिक फायद्यासाठी अनधिकृतपणे बाहेर पोहोचवण्यात आल्याचे समोर आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
या प्रकरणात शासकीय पदाचा गैरवापर, परीक्षेतील गोपनीयतेचा भंग आणि आर्थिक व्यवहाराच्या अनुषंगाने तपास सुरू आहे. पेपरफुटीच्या या कथित रॅकेटमध्ये मध्यस्थ, परीक्षा देणारे उमेदवार तसेच संबंधित यंत्रणेतील व्यक्तींचा सहभाग तपासला जात आहे. या प्रकरणी भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांसह महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा (अनुचित मार्गास प्रतिबंध) अधिनियम, २०२४ आणि भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, १९८८ मधील तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे शाखेच्या तपासात या प्रकरणातील आर्थिक व्यवहार, प्रश्नपत्रिका बाहेर पोहोचवण्याची पद्धत आणि आरोपींचे परस्पर संबंध यांचा तपास केला जात आहे.
Raj Thackeray : “सत्ताधाऱ्यांना जमिनीवर आणायचं असेल तर…” राज ठाकरेंचं विरोधकांना आवाहन
बुलढाण्यातून झालेली अटक या प्रकरणातील महत्त्वाची बाब ठरली असून, तपासाची व्याप्ती आता महाराष्ट्रातील विविध भागांपर्यंत पोहोचल्याचे दिसून येत आहे. या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे आणि पेपरफुटीची साखळी नेमकी कुठपर्यंत होती, याचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखेकडून पुढील तपास सुरू आहे.








