नागपूर पदवीधर निवडणुकीत अजित पवारांच्या पक्षाचा स्वबळाचा इशारा
Nagpur Municipal corporation महापालिका निवडणुकीत भाजपने शेवटच्या क्षणी पाठीत खंजीर खुपसल्याचा राग मनात धरून आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत आर-पारची लढाई लढण्याची तयारी केली आहे. आम्हाला झुलवत ठेवून धोका देणाऱ्यांना आता आमची खरी ताकद दाखवून देऊ, असा थेट इशारा देत राष्ट्रवादीने नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी तब्बल ५,००० पदवीधरांची नोंदणी करत थेट ‘स्वबळा’चा एल्गार पुकारला आहे.
खासदार प्रफुल्ल पटेल आणि खासदार राजेंद्र जैन यांच्या माबार्गदर्शनाखाली तसेच शहराध्यक्ष अनिल अहिरकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या तप्त आढावा बैठकीत या आक्रमक रणनीतीवर शिक्कामोर्तब करण्यात आले.
बैठकीनंतर बोलताना शहराध्यक्ष अनिल अहिरकर म्हणाले, आम्ही महायुती धर्म पाळत होतो, पण महापालिकेच्या वेळी भाजपने आम्हाला शेवटपर्यंत बैठकांमध्ये अडकवून ठेवले आणि ऐनवेळी युती तोडून पाठीत वार केला. तरीही आम्ही ८७ जागा लढवून आमचा जनाधार सिद्ध केला, असे सांगत त्यांनी पक्षाचा विस्तार करण्याचा आम्हाला पूर्ण अधिकार असल्याचे स्पष्ट केले.
शेवटी मानसन्मान महत्त्वाचा असतो. महापालिका निवडणुकीच्यावेळी आपण सोबत लढू असे जाहीर करण्यात आले होते. त्यानंतर भाजपच्या एकाही नेत्यांनी पुढाकार घेतला नाही. युती व जागावाटपाची बोलणी केली नाही. कोणी भेटायलासुद्धा आले नसल्याचे अहीरकर यांनी सांगितले.
भाजप जर आम्हाला गृहीत धरून विचारणाच करणार नसेल, तर या पदवीधर निवडणुकीत आम्ही आमची खरी ताकद दाखवून देऊ, असा थेट इशाराच अहिरकर यांनी यावेळी दिला. उमेदवाराच्या नावावर अद्याप चर्चा झालेली नसून पुढील बैठकांमधून योग्य उमेदवार निश्चित केला जाईल, असेही त्यांनी नमूद केले. निवडणुकीच्या या रणधुमाळीत पदवीधर नोंदणी प्रमुख प्रा. माधुरी पालीवाल आणि तुषार फुले यांनी तब्बल १२०० नवीन पदवीधरांचे नोंदणी अर्ज वरिष्ठ नेतृत्वाकडे सोपवून जोरदार शक्तीप्रदर्शन केले.
Student Elections : महाराष्ट्रातील महाविद्यालयांत पुन्हा विद्यार्थी निवडणुकांचा मार्ग मोकळा होणार?
या बैठकीला शहर कार्याध्यक्ष श्रीकांत शिवणकर, बजरंग सिंग परिहार, रमेश फुले, लक्ष्मी सावरकर, मुकेश रेवतकर, राजू मिश्रा, वसीम लाला शेख, राजेश समर्थ, विश्वास समर्थ, जयदेव चिवांडे, भूषण हरडे, रमेश काळे, लक्ष्मीकांत पांडे, अमरपाल सिंग राजपूत, राजबीर सिंह ओसान, रवींद्र वाठ, विश्वास सेलसूरकर, भोला पटेल, किशोर मडावी, शुभम मडावी, प्रभूदास तायवाडे, विजय मैदमवार आणि तारेश वाघमारे यांच्यासह विविध सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी एकमुखाने पक्षाच्या उमेदवाराला विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला.








