व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home ताज्या बातम्या बच्चू कडू सत्तेत असूनही विरोधकांची भूमिका घेतात !

बच्चू कडू सत्तेत असूनही विरोधकांची भूमिका घेतात !

गिरीश महाजनांचा टोला, ठाकरेंवरही निशाणा

Nagpur : शिवसेना शिंदे गटाचे आमदार बच्चू कडू सत्ताधारी आघाडीचा भाग असतानाही सातत्याने सरकारविरोधी भूमिका घेत असल्याचा टोला मंत्री गिरीश महाजन यांनी लगावला. “बच्चू कडू चुकून सत्तेत आले असावेत, त्यांची भूमिका आजही विरोधकांसारखीच दिसते,” असे महाजन यांनी म्हटले. सरकारमधील व्यक्तींनी आपले प्रश्न आणि मतभेद सरकारसमोर मांडावेत, केवळ बाहेरून प्रतिक्रिया देण्याची गरज नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांना शेतमालाला हमीभाव मिळावा, अशी भूमिका मांडली होती. त्यावर प्रतिक्रिया देताना गिरीश महाजन यांनी सध्या हमीभावाची व्यवस्था अस्तित्वात असल्याचे सांगितले. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा विविध शेतमालाच्या दरांमध्ये नेमका किती फरक आहे, याची वस्तुनिष्ठ माहिती तपासणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

शेतकऱ्यांसाठी मुनगंटीवारांचा प्रशासनाला थेट ‘अलर्ट’

दरम्यान, राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाला झालेला विलंब आणि पेरणीनंतर काही भागांत पडलेला खंड यामुळे पिण्याचे पाणी तसेच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर शासन आवश्यक त्या उपाययोजना करणार असून शेतकऱ्यांनी चिंता करू नये, असे महाजन यांनी सांगितले.

नुकसानग्रस्त भागांत पंचनाम्यांची प्रक्रिया सुरू असून अधिकारी शेतांवर जाऊन पाहणी करत आहेत. पंचनामे पूर्ण झाल्यानंतर पात्र शेतकऱ्यांना नियमानुसार तातडीने मदत देण्याची कार्यवाही केली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली. आगामी रब्बी हंगामासाठी पुरेसा पाऊस पडावा, नदी-नाले आणि धरणे भरावीत तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

मतदारयादीतून वगळलेली नावे पूर्ववत करा, एसआयआरला आव्हान

दरम्यान, दिवाळीनंतर राज्य मंत्रिमंडळात खांदेपालट होण्याचे संकेत बच्चू कडू यांनी दिले होते. याबाबत महाजन यांना विचारले असता, “मंत्रिमंडळातील बदलाबाबत मला सध्या कोणतीही माहिती नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले. राज ठाकरे यांच्या मतदार यादी आणि विशेष पुनरिक्षणाशी संबंधित भूमिकेवरही महाजन यांनी टीका केली.

मतदार यादीतील संशयास्पद किंवा दुबार नावे कमी करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगत, ज्यांना आक्षेप आहेत त्यांनी नियमानुसार अर्ज करून आपली हरकत नोंदवावी, असे आवाहन त्यांनी केले. राज ठाकरे तसेच काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून विविध मुद्द्यांवर सरकारवर टीका केली जात असल्याचा उल्लेख करत महाजन यांनी विरोधकांवरही निशाणा साधला. बोगस मतांच्या आधारे निवडणूक जिंकता येईल, असा समज चुकीचा असल्याचे ते म्हणाले.
___

error: Content is protected !!