काँग्रेसकडून पुन्हा अभिजित वंजारींवर विश्वास, चर्चांना पूर्णविराम
Nagpur नागपूर विभागीय पदवीधर मतदारसंघात गेल्या निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवणारे आमदार अभिजित वंजारी यांच्यावर काँग्रेस पक्षाने पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे. पक्षाकडून त्यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा करण्यात आल्यामुळे, वंजारी पक्षांतर करणार की काय, याविषयी गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या तर्कवितर्कांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे.
अभिजित वंजारी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. भाजपच्या काही नेत्यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला होता. मात्र, बाहेरून येणाऱ्या उमेदवाराला पक्षात स्थान देण्यावरून भाजपमधील एका गटाने तीव्र विरोध दर्शवला होता. वंजारींना पक्षात घेतल्यास पक्षात मोठी बंडखोरी होण्याची शक्यता वर्तवली जात होती.
आढावा झाला, पण ‘ॲक्शन’ कधी? सहपालकमंत्र्यांच्या दौऱ्यात विषयही नाही!
दुसरीकडे, पदवीधर नोंदणीत भाजपने मोठी आघाडी घेतली आहे. नागपूर शहरात भाजपने तब्बल ८० हजार मतदारांची नोंदणी केली असून, यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण-पश्चिम नागपूर आणि दक्षिण नागपूर या मतदारसंघांचा वाटा मोठा आहे. अडीच लाखांच्या मतदारसंघात ही संख्या निर्णायक ठरणार असल्याने पक्षाचा आत्मविश्वास वाढला आणि भाजपने वंजारी यांच्या प्रवेशाचा विषय सोडून दिल्याचे समजते.
मागील निवडणुकीत अभिजित वंजारी यांनी भाजपचे उमेदवार संदीप जोशी यांचा पराभव करत भाजपचा हा पारंपरिक बालेकिल्ला खेचून आणला होता. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, स्व. गंगाधरराव फडणवीस आणि अनिल सोले यांनी दीर्घकाळ प्रतिनिधित्व केलेल्या या मतदारसंघात भाजपचा पराभव होणे हा मोठा धक्का मानला जात होता. त्यावेळी तत्कालीन आमदार अनिल सोले यांचे तिकीट ऐनवेळी कापून मुख्यमंत्र्यांचे निकटवर्ती संदीप जोशी यांना उमेदवारी देण्यात आली होती. यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला होता. त्यातच महाविकास आघाडीच्या एकजुटीचा फायदा उठवत वंजारी यांनी बाजी मारली होती.
‘ही सुरक्षा की शिक्षा?’ सहपालकमंत्र्यांसमोर नागरिकांची तीव्र नाराजी
सध्या राज्यातील राजकीय परिस्थिती बदलली असून राज्यात सत्ता भाजपच्या हाती आहे. भाजपने सुधाकर कोहळे यांना मतदार नोंदणी प्रमुख करून त्यांना उमेदवारी देण्याचे सुतोवाच केले आहे. दुसरीकडे, गेल्या वेळी अन्याय झालेल्या अनिल सोले यांनीही पुन्हा तयारी सुरू केली असून, त्यांना उमेदवारी मिळण्याची आशा आहे. काँग्रेसने वंजारींच्या नावाची घोषणा करून आपली चाल खेळली असून, आता भाजप कोणाच्या गळ्यात उमेदवारीची माळ घालते, याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.








