महायुतीत भाजप, शिवसेना व युवा स्वाभिमानचे दावे; मविआतही काँग्रेस-उबाठेकडून स्वतंत्र उमेदवार
Amravati अमरावती विभागीय शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये उमेदवारीवरून एकवाक्यता नसल्याचे चित्र आहे. दोन्ही आघाड्यांतील घटक पक्षांकडून स्वतंत्रपणे उमेदवार पुढे करण्यात आल्याने निवडणुकीतील राजकीय समीकरणे बदलली आहेत.
महायुतीमध्ये ही जागा शिवसेनेच्या वाट्याला असल्याचे सांगितले जात असले तरी भाजपकडून शेखर भोयर आणि संगीता शिंदे-बोंडे यांनी उमेदवारी जाहीर केली आहे. युवा स्वाभिमान पक्षानेही ॲड. प्रीती रेवणे-बनारसे यांना उमेदवारी दिली आहे. शिवसेनेकडून मावळते आमदार किरण सरनाईक आणि प्रा. श्रीकांत देशपांडे हे दोघेही उमेदवारीसाठी दावेदार आहेत.
मविआतही स्वतंत्र उमेदवार
महाविकास आघाडीतही उमेदवारीवर एकमत झालेले नाही. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने दत्तात्रय लहाने यांना उमेदवारी दिली आहे. दुसरीकडे, माजी मंत्री हर्षवर्धन देशमुख यांच्या कन्या प्रा. अदिती पोहरे-देशमुख यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना पक्षाकडून उमेदवारी मिळाली आहे.
शिक्षक संघटनांच्या निवडणुकीला राजकीय रंग
अमरावती शिक्षक मतदारसंघाची निवडणूक यापूर्वी प्रामुख्याने शिक्षक संघटनांच्या माध्यमातून लढवली जात होती. मात्र, यंदा विविध राजकीय पक्षांशी संबंधित उमेदवारांनी थेट निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची भूमिका घेतल्याने या निवडणुकीला राजकीय स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यामुळे विविध पक्षांच्या उमेदवारांमुळे मतविभाजनाचे चित्र निर्माण झाले आहे.








