व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण गडचिरोलीत वासेकरांच्या बैठकींनी राजकीय चर्चेला उधाण

गडचिरोलीत वासेकरांच्या बैठकींनी राजकीय चर्चेला उधाण

राजकीय समीकरणांची वेगळी आखणी की ‘मोठ्या डावाची’ तयारी

Gadchiroli : सध्या पदवीधर मतदारसंघाची निवडणूक वगळता जिल्ह्यात अन्य कोणत्याही निवडणुकीचे स्पष्ट वारे जाणवत नसले, तरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष रविंद्र वासेकर यांनी सुरू केलेल्या कार्यकर्ता बैठकांमुळे गडचिरोलीच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. कोरचीपासून सिरोंचापर्यंत कार्यकर्त्यांशी संपर्क साधत वासेकर यांनी बैठकांचा धडाका सुरू केल्याने या हालचाली केवळ पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी आहेत की त्यामागे आगामी राजकीय समीकरणांची काही वेगळी आखणी आहे, याबाबत तर्कवितर्क सुरू झाले आहेत.

आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्या विश्वासातील नेते म्हणून रविंद्र वासेकर यांच्याकडे पाहिले जाते. सध्या ते कोणत्याही संविधानिक पदावर नसले तरी पक्षाच्या संघटनात्मक कामकाजात त्यांची सक्रियता कायम चर्चेचा विषय राहिली आहे. जिल्ह्यातील विविध राजकीय घडामोडींमध्ये पडद्यामागून भूमिका बजावणाऱ्या नेत्यांमध्ये त्यांचा समावेश केला जातो. विशेषतः यापूर्वी जिल्हा परिषदेतील सत्तेची समीकरणे जुळवताना झालेल्या राजकीय वाटाघाटींमध्ये वासेकर यांची भूमिका महत्त्वाची ठरल्याचे मानले जाते. त्यामुळे सध्या अचानक वेगाने सुरू झालेल्या कार्यकर्ता बैठकींकडे राजकीय निरीक्षकांचेही लक्ष लागले आहे.

निवडणूक कार्यालयावर इंडिया आघाडीची धडक; बॅरिकेड्स तोडणाऱ्या राहुल आणि प्रियंका गांधींना पोलिसांनी घेतले ताब्यात

निवडणुकीची कोणतीही अधिकृत घोषणा नसताना पक्षाच्या जिल्हाध्यक्षांकडून तालुकानिहाय कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधला जात आहे. संघटनात्मक बांधणी, कार्यकर्त्यांची स्थिती, पक्षाची आगामी भूमिका आणि स्थानिक पातळीवरील राजकीय वातावरण याचा आढावा घेण्यासाठी या बैठका होत असल्याचे मानले जात असले, तरी त्यामागे भविष्यातील राजकीय रणनीतीची चाचपणी सुरू असल्याची चर्चाही रंगू लागली आहे.

गडचिरोलीसारख्या राजकीयदृष्ट्या संवेदनशील जिल्ह्यात प्रत्येक मोठ्या राजकीय हालचालीचे दूरगामी परिणाम होऊ शकतात. त्यामुळे वासेकर यांच्या दौऱ्यांकडे आणि बैठकींकडे सध्या केवळ संघटनात्मक उपक्रम म्हणून पाहायचे की आगामी सत्तासमीकरणांसाठीची जमवाजमव म्हणून, हा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित झाला आहे.

पाणी कपात करायचीच होती तर ३८ हजार कोटींचा ‘उपसा’ कशाला?

कार्यकर्ता बैठकांच्या माध्यमातून पक्षाची ताकद तपासली जात आहे का, आगामी निवडणुकांसाठी संभाव्य उमेदवारांची चाचपणी सुरू आहे का किंवा स्थानिक पातळीवरील राजकीय समीकरणे नव्याने जुळवण्याची तयारी आहे, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. मात्र, निवडणुकीचे वातावरण नसतानाही सुरू असलेल्या या हालचालींमुळे ‘मोठ्या डावाची ही पूर्वतयारी तर नाही ना?’ अशी कुजबुज आता गडचिरोलीच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

error: Content is protected !!