व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण भाजपचा ‘दोन नंबरचा शत्रू’ कोण? नागपूर पदवीधर निवडणुकीतील पराभवामागील षढयंत्राचा शोध सुरू

भाजपचा ‘दोन नंबरचा शत्रू’ कोण? नागपूर पदवीधर निवडणुकीतील पराभवामागील षढयंत्राचा शोध सुरू

मुख्यमंत्र्यांचे तपासाचे आदेश, अनेकांचे धाबे दणाणले.

Nagpur: नागपूर विभागीय शिक्षक/पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत भाजपचे उमेदवार सुधाकर कोहळे यांच्या झालेल्या पराभवाने पक्षात मोठी खळबळ उडाली आहे. हा पराभव केवळ राजकीय नसून तो पक्षांतर्गत घातपात असल्याचा संशय बळावला आहे. विशेषतः, कोहळे यांच्या नावासमोर जाणीवपूर्वक ‘दोनचा आकडा’ लिहून मते अवैध ठरवण्याचा प्रकार समोर आल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संपूर्ण प्रकरणाची कसून चौकशी करण्याचे कडक आदेश दिले आहेत. या तपासामुळे नागपूरमधील अनेक स्थानिक नेत्यांचे आणि पदाधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
या निवडणुकीत एकूण २ लाख ५५ हजार नोंदणीकृत मतदारांपैकी १ लाख ६५ हजार मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. मतमोजणीदरम्यान तब्बल १५ हजार मते अवैध ठरली, ज्याने निकालाचे चित्र पूर्णपणे बदलले. पहिल्या पसंतीच्या मतात सुधाकर कोहळे यांनी सुमारे ५ हजार मतांची आघाडी घेतली होती. मात्र, दुसऱ्या पसंतीच्या मतांवर आणि अवैध ठरलेल्या मतांवर भाजपचा घात झाला.
सुधाकर कोहळे यांना मिळालेल्या सुमारे साडेआठ हजार मतपत्रिकेवर त्यांच्या नावापुढे ‘दोन’ (२) हा आकडा लिहण्यात आला आहे. विशेष म्हणजे, मतपत्रिकेत कोहळे यांचे नाव दुसऱ्या क्रमांकावर होते. सुरुवातीला ही साधी नैसर्गिक चूक असावी असे वाटले, परंतु हा आकडा तब्बल साडेआठ हजारांपर्यंत पोहोचताच भाजप वर्तुळात मोठी खळबळ उडाली. कोहळे यांना पराभूत करण्यासाठी ही पूर्वनियोजित खेळी असल्याचे स्पष्ट होत आहे.

गडचिरोली जिल्हा परिषदेत ७८ टक्के आरक्षण; ओबीसींच्या जागांवर टांगती तलवार!

कोहळे यांच्या ५ हजार मतांची आघाडी आणि अवैध ठरलेली साडेआठ हजार मते एकत्र केली असती, तर कोहळे यांना पहिल्याच फेरीत निर्णायक आघाडी मिळाली असती. मात्र, ही खेळी कुणा विरोधकांची नसून नाराज आणि दुखावलेल्या पक्षांतर्गत कार्यकर्त्यांचेच षढयंत्र असल्याची चर्चा जोर धरत आहे. निवडणुकीतील हा अंतर्गत असंतोष आणि घातपाताची बातमी पक्षातील नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर घातली. हा प्रकार कोणतीही नैसर्गिक चूक नसून जाणीवपूर्वक रचलेला कट असल्याचे लक्षात आल्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी स्थानिक नेत्यांना या प्रकरणाचा तातडीने शोध घेऊन अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

हिवाळी अधिवेशन रद्द करून निधी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना द्या!

सध्या भाजपकडून मतपत्रिकेद्वारे थेट त्या मतदारांपर्यंत पोहोचून ‘मुख्य सूत्रधाराचा’ माग काढला जात आहे. उमेदवारीवरून सुरुवातीपासूनच पक्षात मोठा असंतोष होता. माजी आमदार अनिल सोले यांनी पुकारलेले बंड आणि गिरीश व्यास यांच्या समर्थकांचे राजीनामे पाहता, पक्षाने वरवर मलमपट्टी केली असली तरी अंतर्गत रोष कायम होता. हाच रोष निकालात घात ठरल्याचे आता उघड होत असून, या तपासाच्या फेऱ्यात कोण-कोण अडकणार, याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे.

error: Content is protected !!