जिल्हाधिकारी कार्यालयात खलबते; काही अधिकाऱ्यांची विभागवार हजेरी, तर काहींना सलग आठ तास खुर्चीवर बसण्याची वेळ
Gadchiroli : सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालयात विविध शासकीय विभागांचा सविस्तर आढावा घेतला. दुपारी १२ वाजता सुरू झालेल्या बैठकांचे सत्र रात्री ८ वाजता संपले. तब्बल आठ तास चाललेल्या या मॅरेथॉन बैठकांमध्ये दुष्काळ निवारण, रस्त्यांची दुरवस्था, आरोग्य सुविधा, पाणीटंचाई आणि वन्यप्राण्यांचा वाढता उपद्रव अशा महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली.
बैठकांचे स्वरूप विभागनिहाय असल्याने संबंधित खात्यांचे अधिकारी आपापल्या विषयानुसार उपस्थित राहिले. काहींनी आवश्यक अहवाल आणि माहिती सादर केली, मंत्र्यांच्या सूचना ऐकल्या आणि बैठक संपताच काढता पाय घेतला. मात्र, या संपूर्ण आढावा प्रक्रियेत वरिष्ठ अधिकारी आणि नियोजन विभागाची चांगलीच कसोटी लागली. कारण विभाग बदलत गेले, अधिकारी येत-जात राहिले; परंतु काही अधिकाऱ्यांना सुरुवातीपासून शेवटपर्यंत बैठकांमध्ये उपस्थित राहावे लागले.
वसंत साखर कारखाना प्रकरणाला नवे वळण; ४ नोव्हेंबरला सहकार मंत्र्यांसमोर सुनावणी!
आढाव्यादरम्यान विविध विभागांच्या कामकाजावर प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली. प्रलंबित कामे, प्रशासकीय दिरंगाई आणि नागरिकांच्या समस्यांबाबत अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात आला. काही अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या, तर काही प्रश्नांवर समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने संबंधितांची चांगलीच कोंडी झाल्याची चर्चा होती.
विशेष म्हणजे, आठ तासांच्या या बैठकीत केवळ विषयांचे सादरीकरण झाले नाही, तर विविध योजनांच्या अंमलबजावणीपासून स्थानिक प्रश्नांच्या सोडवणुकीपर्यंत अनेक मुद्द्यांवर मंथन झाले. वन्यप्राण्यांच्या उपद्रवापासून रस्ते आणि पाणीपुरवठ्यापर्यंत नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित प्रश्नांना प्राधान्य देण्यात आले.
विभागवार अधिकारी बदलत असताना संपूर्ण वेळ उपस्थित राहणाऱ्या अधिकाऱ्यांची मात्र चांगलीच सत्वपरीक्षा झाली. आठ तासांच्या बैठकीनंतर प्रशासकीय वर्तुळात या मॅरेथॉन आढाव्याची चर्चा रंगली. काहींसाठी ही नियमित प्रशासकीय बैठक होती, तर काहींसाठी ती संयम, तयारी आणि उत्तरदायित्वाची कसोटी ठरल्याची कुजबुज मात्र जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात सुरू आहे.








