काँग्रेसच्या राज्यांत शेतकऱ्यांना मदतीसाठी तब्बल १७ निकष
Nagpur महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी गोड व्हावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने ५ हजार रुपयांची मदत जाहीर केली असून, राज्यातील जवळपास दीड कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात हा पहिला हप्ता जमा होण्यास सुरुवातही झाली आहे. मात्र, याउलट काँग्रेसशासित राज्यांत दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना एक रुपयाचीही आर्थिक मदत मिळालेली नसून तिथे केवळ घोषणांचाच पाऊस पाडला जात आहे, अशी तिखट प्रतिक्रिया आमदार परिणय फुके यांनी नागपूर येथे माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.
कर्नाटकमध्ये मदतीसाठी तब्बल १७ कठीण निकष ठरवण्यात आले असून, या जाचक अटींमुळे एकाही शेतकऱ्याला मदत मिळणार नाही हे स्पष्ट दिसत आहे. काँग्रेसचे नेते फक्त खोटे बोलतात आणि बिनबुडाचे आरोप करतात, असा घणाघात त्यांनी केला.
संवादादरम्यान फुके म्हणाले की, संकटग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा शब्द देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता आणि तो पाळत केंद्र सरकारच्या सहकार्याने दीड कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात ५ हजार रुपयांचा हप्ता जमा करण्यास सुरुवात केली आहे. याशिवाय दुष्काळात मृत्यू झाल्यास मिळणारी मदत ४ लाखांवरून थेट ८ लाख रुपये करण्यात आली आहे. काँग्रेस पक्ष कायम दुटप्पी भूमिका घेतो, तर यापूर्वी उद्धव ठाकरे यांच्या सरकारच्या काळातही शेतकऱ्यांना रुपयाचीही मदत मिळाली नव्हती, असा आरोप करत विरोधी पक्ष शेतकऱ्यांना भ्रमित करण्याचे काम करत असल्याचे ते म्हणाले.
शेतकऱ्यांसाठी मुनगंटीवारांचा हुंकार; दिवाळीच्या तोंडावर मदतीचे दोन शासन आदेश!
यावेळी राहुल गांधी यांच्या दिल्लीतील आंदोलनावर जोरदार टीका करताना फुके यांनी गंभीर आरोप केले. राहुल गांधी यांनी व्हिएतनाममध्ये जाऊन ‘मोहब्बतची दुकान’ उघडले आहे आणि आपल्या देशातील दुकाने मात्र ते खराब करत आहेत. सणासुदीच्या आणि दिवाळीच्या पूर्वसंध्येला जाणीवपूर्वक आंदोलने करून दिल्लीतील व्यापाऱ्यांचे सुमारे ११ हजार कोटी रुपयांचे नुकसान घडवून आणले गेले आहे.
देशाचे आर्थिक नुकसान करण्यासाठीच हिंदू सणांच्या काळात ही ‘पेड’ आणि स्पॉन्सर्ड आंदोलने केली जात आहेत. या आंदोलनांना फॉरेन फंडिंग होत असून, काही एनजीओंच्या माध्यमातून देशात अराजकता आणि अस्थिरता पसरवण्याचे विरोधी पक्षांचे षडयंत्र आहे, अशी माहिती आयबीच्या अहवालातही आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या देशविरोधी कृत्याला चोख उत्तर देण्यासाठी भारतातील प्रत्येक शहरात नागरिक एकत्र येत असून, राहुल गांधी आणि इंडिया आघाडीच्या आंदोलनापेक्षाही मोठे प्रत्युत्तर भाजपच्या वतीने देशभरात दिले जाईल, असा इशारा आमदार परिणय फुके यांनी दिला.








