ग्रामीण राजकारणात प्रतीक्षेचा खेळ ; कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम, लोकप्रतिनिधींची प्रतीक्षा
Yavatmal: जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका नेमक्या कधी होणार, याकडे संपूर्ण ग्रामीण महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. गेल्या साडेचार वर्षांपासून या निवडणुका रखडल्याने इच्छुक उमेदवारांच्या राजकीय महत्त्वाकांक्षांना ब्रेक लागला असून, कार्यकर्ते आणि मतदारांमध्येही अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार की प्रतीक्षेचा कालावधी आणखी वाढणार, हा प्रश्न सध्या ग्रामीण राजकारणात चर्चेचा विषय ठरत आहे.
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या ग्रामीण भागाच्या विकासातील महत्त्वाच्या संस्था मानल्या जातात. गावागावांतील रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य सुविधा, शिक्षण, सिंचन आणि स्वच्छतेसह विविध विकासकामांच्या नियोजनात या संस्थांची भूमिका महत्त्वपूर्ण असते. मात्र, लोकनियुक्त प्रतिनिधींचा कार्यकाळ संपल्यानंतर निवडणुका लांबल्याने स्थानिक प्रश्नांना राजकीय पातळीवर प्रभावीपणे मांडण्यासाठी मर्यादा निर्माण होत असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे.
दरम्यान, निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अनेक इच्छुकांनी गेल्या काही वर्षांपासून आपापल्या मतदारसंघात राजकीय मोर्चेबांधणी सुरू ठेवली आहे. सण-उत्सव, सामाजिक कार्यक्रम, विवाह सोहळे, सार्वजनिक उपक्रम आणि विविध मदतीच्या माध्यमातून मतदारांशी संपर्क कायम ठेवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. काही इच्छुकांनी पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडे उमेदवारीसाठीही जोरदार प्रयत्न केले आहेत. मात्र, निवडणुकीच्या तारखेबाबतच निश्चितता नसल्याने या राजकीय तयारीचा खर्च आणि मेहनत आणखी किती काळ सुरू ठेवायची, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे.
आरक्षण आणि प्रभागरचनेच्या निर्णयाकडे लक्ष
निवडणूक प्रक्रियेत आरक्षण निश्चिती, प्रभागरचना, मतदारसंघांची फेररचना आणि न्यायालयीन प्रक्रियांसारख्या बाबी निर्णायक ठरत आहेत. या सर्व प्रक्रियांना अंतिम स्वरूप मिळून निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची प्रतीक्षा इच्छुकांना आहे. आरक्षणाचे चित्र स्पष्ट नसल्याने कोणत्या गटातून निवडणूक लढवायची, कोणत्या मतदारसंघात संधी मिळू शकते आणि बदललेल्या राजकीय समीकरणांत कोणाला फायदा होईल, याबाबतही संभ्रम कायम आहे.
शेतकऱ्यांसाठी मुनगंटीवारांचा हुंकार; दिवाळीच्या तोंडावर मदतीचे दोन शासन आदेश!
कार्यकर्त्यांचा उत्साहही मंदावण्याची शक्यता
निवडणुकीच्या तयारीसाठी इच्छुकांनी कार्यकर्त्यांची स्वतंत्र फळी उभी केली आहे. मात्र, वारंवार निवडणुका होण्याच्या चर्चा रंगतात आणि प्रत्यक्ष घोषणा होत नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्येही अनिश्चितता वाढत आहे. दुसरीकडे, गावांतील प्रलंबित विकासकामे, स्थानिक समस्या आणि नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांसाठी जबाबदार लोकप्रतिनिधी कधी मिळणार, असा सवाल मतदार उपस्थित करत आहेत.
एकीकडे इच्छुकांची राजकीय गणिते रखडली आहेत, तर दुसरीकडे ग्रामीण जनतेला लोकशाही प्रक्रियेतून आपले प्रतिनिधी निवडण्याची संधी मिळण्याची प्रतीक्षा आहे. त्यामुळे आता निवडणूक आयोग आणि शासनाकडून निवडणूक कार्यक्रमाबाबत स्पष्ट घोषणा कधी होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.








