व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण अजय कंकडालवार यांचा दक्षिण गडचिरोलीत जनसंपर्क वाढला!

अजय कंकडालवार यांचा दक्षिण गडचिरोलीत जनसंपर्क वाढला!

जिल्हा परिषद निवडणुकीसाठी चाचपणी सुरू असल्याचा चर्चा

Gadchiroli : जिल्हा परिषद निवडणुकांचे पडघम वाजण्यापूर्वीच दक्षिण गडचिरोलीच्या राजकीय वर्तुळात माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या वाढत्या सक्रियतेची चर्चा सुरू झाली आहे. अहेरीसह दक्षिण गडचिरोलीतील विविध तालुक्यांमध्ये त्यांनी जनसंपर्क वाढविण्यावर भर दिला असून, दुर्गम गावांपर्यंत पोहोचत स्थानिक कार्यक्रमांमध्ये सहभाग नोंदविण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्या या हालचालींमागील राजकीय गणित काय, याबाबत आता तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

अलीकडेच सिरोंचा तालुक्यातील लंबडपल्ली आणि भामरागड तालुक्यातील मिरगुळवंचा या अतिदुर्गम गावांमध्ये आयोजित व्हॉलीबॉल स्पर्धांचे उद्घाटन कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी खेळाडूंना प्रोत्साहन देत बक्षिसांचे वितरणही केले. दुर्गम भागातील क्रीडा उपक्रमांना उपस्थिती लावण्याच्या माध्यमातून त्यांनी ग्रामीण भागातील नागरिक आणि युवकांशी संपर्क वाढविण्याचा प्रयत्न केल्याचे राजकीय निरीक्षकांकडून मानले जात आहे.

सरकारी ‘आनंदाचा शिधा’ गायब; खासदारांकडे मात्र दिवाळी फराळाचे वाटप!

कंकडालवार यांची राजकीय वाटचालही लक्षवेधी राहिली आहे. माजी आमदार दीपक आत्राम यांच्याशी राजकीय अंतर निर्माण झाल्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर पक्षात सक्रिय राहत त्यांनी आपले राजकीय स्थान निर्माण केले. मागील जिल्हा परिषद निवडणुकीत अहेरी तालुक्यातील वेलगूर-आलापल्ली गटातून निवडून येत त्यांनी जिल्हा परिषदेच्या राजकारणात प्रवेश केला. पुढे जिल्हा परिषद अध्यक्षपद आणि उपाध्यक्षपदाची जबाबदारीही त्यांनी सांभाळली.

दक्षिण गडचिरोलीतील विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव असल्याने कंकडालवार यांच्यासाठी विधानसभा निवडणुकीचे पर्याय मर्यादित आहेत. असे असतानाही संपूर्ण परिसरात त्यांचा वाढता संपर्क नेमका कोणत्या राजकीय उद्देशाने आहे, हा चर्चेचा विषय ठरत आहे.

शेतकऱ्यांच्या तुटपुंज्या मदतीवरून काँग्रेस आक्रमक

आगामी जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आतापासूनच राजकीय तयारी सुरू केल्याचे संकेत त्यांच्या दौऱ्यांतून मिळत आहेत. मात्र, त्यांचे पुढील राजकीय लक्ष्य कोणते असेल, कोणत्या गटातून ते निवडणुकीच्या मैदानात उतरणार किंवा पक्षासाठी कोणती भूमिका बजावणार, याचे चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे अजयभाऊंचा हा राजकीय सराव नेमका कोणत्या मैदानासाठी आहे, याचे उत्तर आगामी काळातच मिळणार आहे.

error: Content is protected !!