व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र शेतकऱ्यांच्या संकटांवर मात करण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज : पालकमंत्री डॉ. पंकज भोयर

शेतकऱ्यांच्या संकटांवर मात करण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज : पालकमंत्री डॉ. पंकज भोयर

शेतकरी, आदिवासी बांधवांसोबत दिवाळी; समस्यांच्या निराकरणासाठी पाठपुराव्याची ग्वाही

Wardha: नैसर्गिक आपत्ती आणि बदलत्या हवामानामुळे शेती क्षेत्रासमोर अनेक आव्हाने उभी राहत आहेत. मात्र, अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी खचून न जाता धैर्याने आणि एकजुटीने संकटांचा सामना करावा. शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी शासन त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असून, त्यांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी आवश्यक पाठपुरावा केला जाईल, अशी ग्वाही जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी दिली.

दीपावलीच्या पार्श्वभूमीवर सालोड (हिरापूर) येथे आयोजित बळीराजा शेतकरी दीपावली मिलन सोहळ्यात ते बोलत होते. या कार्यक्रमाला माजी खासदार रामदास तडस, सुनील गफाट, सरपंच अमोल कन्नाके, उपसरपंच आशीष कुचेवार, युवा शेतकरी तथा उद्योजक राहुल वांदिले, पृथ्वीराज शिंदे यांच्यासह शेतकरी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दिवाळीच्या निमित्ताने गावातील शेतकरी आणि ग्रामस्थांना एकत्र येऊन विचारांची देवाणघेवाण करण्याची संधी मिळत असल्याबद्दल पालकमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी त्यांच्या हस्ते महिला, युवा आणि ज्येष्ठ शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. उपस्थितांना दिवाळी फराळाचेही वाटप करण्यात आले. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर संवाद साधताना त्यांच्या अडचणी समजून घेऊन त्या सोडविण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

दादांच्या विमान अपघातात सुनील तटकरेंचा हात?

दरम्यान, सेलू तालुक्यातील नवरगाव पुनर्वसन ग्रामपंचायतीतही पालकमंत्री डॉ. भोयर यांच्या उपस्थितीत आदिवासी बांधव आणि शेतकऱ्यांसोबत दिवाळी उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी उपविभागीय अधिकारी कुश मोटवाणी, तहसीलदार डॉ. शंकुतला पाराजे, गटविकास अधिकारी देवानंद पाणबुडे, मयूर महाराज दरणे, किशोर दिघे, अशोक कलोडे, विनोद लाखे, माजी सरपंच कडूकर, राहुल वांदिले आणि प्रफुल्ल खोडे उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी पालकमंत्र्यांच्या हस्ते ग्रामपंचायतीच्या नवनिर्मित प्रवेशद्वाराचे लोकार्पण करण्यात आले. त्यानंतर लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर दीपप्रज्वलन करून शेतकऱ्यांना दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसीलदार शंकुतला पाराजे यांनी केले. यावेळी गावातील महिला आणि नागरिकांची लक्षणीय उपस्थिती होती.

फळ बागा संकटात धरणाचे पाणी शेतकऱ्यांना द्या आ. वानखेडे यांची आग्रही मागणी !

या दौऱ्यादरम्यान पालकमंत्री डॉ. भोयर यांनी शेतमजूर महिला सुनंदा किसना जुडे यांच्या घरी जाऊन त्यांच्यासोबत भोजन केले. शेतकरी आणि कष्टकरी कुटुंबांशी थेट संवाद साधत दिवाळीचा आनंद सामायिक करण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला.

error: Content is protected !!