व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण जिल्हा बँकेतील सत्ताधाऱ्यांची पुढील राजकीय खेळी काय? पाच विभागीय अध्यक्षांसह नऊ समित्यांच्या...

जिल्हा बँकेतील सत्ताधाऱ्यांची पुढील राजकीय खेळी काय? पाच विभागीय अध्यक्षांसह नऊ समित्यांच्या निवडीकडे लक्ष

महायुतीचे १६, तर महाविकास आघाडीचे ९ संचालक; महत्त्वाच्या पदांवर कोणाची वर्णी लागणार, याबाबत उत्सुकता

 

Yavatmal : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष आणि दोन उपाध्यक्षांची निवड पार पडल्यानंतर आता बँकेतील सत्तावाटपाच्या पुढील टप्प्याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. पाच विभागीय अध्यक्षांची नियुक्ती आणि विविध नऊ समित्यांचे गठन अद्याप बाकी असल्याने संचालकांमध्ये या पदांसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. महत्त्वाच्या पदांवर कोणाला संधी मिळणार आणि सत्ताधारी गटाकडून कोणत्या संचालकांना झुकते माप दिले जाणार, याची उत्सुकता निर्माण झाली आहे.

जिल्ह्यातील १६ तालुक्यांमधील बँकेच्या शाखांचे कामकाज अधिक प्रभावीपणे चालविण्यासाठी यवतमाळ, दारव्हा, पुसद, वणी आणि पांढरकवडा या पाच ठिकाणी विभागीय कार्यालये कार्यरत आहेत. प्रत्येक विभागासाठी एका संचालकाची विभागीय अध्यक्ष म्हणून निवड केली जाते. त्यामुळे या पाच पदांना प्रशासकीय कामकाजासोबतच राजकीयदृष्ट्याही महत्त्व प्राप्त झाले आहे.
याशिवाय कर्ज, वसुली, कार्यकारी, कर्मचारी, बांधकाम, लेखापरीक्षण आणि सायबर यांसह विविध नऊ समित्यांचे गठन होणार आहे. प्रत्येक समितीत आठ ते नऊ संचालकांचा समावेश केला जातो. त्यामुळे या समित्यांमधील सदस्यत्वासाठीही संचालकांमध्ये चुरस असण्याची शक्यता आहे.

शिंदेंच्या शिवसेनेचा नागपुरात ‘मास्टरस्ट्रोक’ की वादाची नांदी? एकाच फटक्यात नेमले ६ शहरप्रमुख

 

बँकेच्या संचालक मंडळात एकूण २५ सदस्य आहेत. त्यापैकी महायुतीचे १६, तर महाविकास आघाडीचे नऊ संचालक असल्याने सत्तेचे पारडे महायुतीच्या बाजूने झुकलेले आहे. त्यामुळे विभागीय अध्यक्षपदांसह समित्यांवरील नियुक्त्यांमध्ये महायुतीच्या संचालकांना अधिक संधी मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मात्र, अंतर्गत राजकीय समीकरणे आणि वरिष्ठ नेत्यांची भूमिका यामुळे कोणाची वर्णी लागणार, हे निवडीच्या घोषणेनंतरच स्पष्ट होणार आहे.

 

विभागीय अध्यक्ष आणि विविध समित्यांच्या सदस्यांची निवड अध्यक्ष व उपाध्यक्षांकडून केली जाते. त्यानंतर संचालक मंडळाच्या सभेत या नावांची अधिकृत घोषणा केली जाते. यापूर्वीही बँकेत हीच पद्धत अवलंबिली गेली आहे. अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची निवड झाल्यानंतर संचालक मंडळाची पहिली सभा पार पडली; मात्र त्यात या नियुक्त्यांबाबत कोणतीही घोषणा किंवा सविस्तर चर्चा झाली नाही. त्यामुळे पुढील सभेत या प्रक्रियेला गती मिळते की आणखी प्रतीक्षा करावी लागते, याकडे लक्ष आहे.

 

केंदळे – नाईक भेटीने वाशिमच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण; सदिच्छा की राजकीय संकेत?

दरम्यान, बँकेच्या काही शाखांमध्ये मागील काही वर्षांत आर्थिक अपहार आणि अनियमिततेची प्रकरणे समोर आली आहेत. दिग्रस, कळंब, जांब बाजार, आर्णी आणि यवतमाळ येथील शाखांशी संबंधित प्रकरणांची विशेष चर्चा आहे. जांब बाजार शाखेतील प्रकरणात लेखापरीक्षण अहवाल प्राप्त झाल्यानंतर पोलिसांकडे तक्रार दाखल झाल्याचेही सांगितले जाते. मागील संचालक मंडळाच्या कार्यकाळात सर्व शाखांची विशेष तपासणी करण्याची मागणी पुढे आली होती.

 

त्यामुळे केवळ पदवाटप आणि समित्यांचे गठन एवढ्यापुरतेच नव्या संचालक मंडळाचे काम मर्यादित राहणार नाही. प्रलंबित चौकशा, आर्थिक अनियमितता आणि जबाबदारांवरील कारवाई याबाबतही नव्या नेतृत्वाची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. सत्तेतील पदांचे वाटप करताना राजकीय समतोल साधला जातो की बँकेच्या कारभाराला प्राधान्य दिले जाते, याचीच आता प्रतीक्षा आहे.

____

yavatmal-district-central-cooperative-bank-division-chairman-committee-formation-political-equations

error: Content is protected !!