हल्ल्याचा प्रयत्न; दोन सुरक्षारक्षक जखमी, तिघे पोलिसांच्या ताब्यात
Chhatrapati Sambhajinagar : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या निवासस्थानाबाहेर मद्यधुंद तरुणांनी गोंधळ घालत हल्ल्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मध्यरात्री घडलेल्या या प्रकारामुळे शहरातील राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या घटनेत दोन सुरक्षारक्षक किरकोळ जखमी झाल्याची माहिती असून, पोलिसांनी संबंधित तीन तरुणांना ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रात्री तीन तरुण शिरसाट यांच्या बंगल्यासमोर आले होते. हे तरुण मद्यधुंद अवस्थेत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांनी बंगल्यासमोर गोंधळ घालत दारूच्या बाटल्या फोडल्या. त्यानंतर सुरक्षारक्षकांशी वाद घालत बंगल्याच्या दिशेने बाटल्या फेकून हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. या झटापटीत दोन सुरक्षारक्षक जखमी झाले.
या घटनेनंतर संजय शिरसाट यांनी पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. घटनेची माहिती देण्यासाठी पोलीस आयुक्तांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा फोन बंद असल्याचा दावा शिरसाट यांनी केला. एका पालकमंत्र्याच्या निवासस्थानाबाहेर अशा प्रकारची घटना घडत असेल, तर सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षेचे काय, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
या प्रकरणाची गंभीर दखल घेण्याची मागणी करत शिरसाट यांनी संपूर्ण घटनेची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांच्या मते, हा प्रकार केवळ त्यांच्या निवासस्थानाशी संबंधित नसून शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित करणारा आहे.दरम्यान, सातारा पोलिसांनी या प्रकरणातील तिन्ही संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू केली आहे. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. या घटनेमागील नेमके कारण, तरुणांचा उद्देश आणि हल्ल्याच्या प्रयत्नामागील पार्श्वभूमी तपासानंतर स्पष्ट होणार आहे.
दिवाळीच्या शुभेच्छांच्या आडून निवडणुकीचे राजकारण तापले! इच्छुकांची मोर्चेबांधणी
विशेष म्हणजे, संजय शिरसाट यांच्या निवासस्थानापर्यंत संशयित व्यक्ती पोहोचण्याची ही पहिलीच घटना नाही. यापूर्वीही एका तरुणाने चाकू घेऊन त्यांच्या बंगल्यापर्यंत पोहोचल्याचा प्रकार घडला होता. त्यामुळे पुन्हा घडलेल्या या घटनेमुळे त्यांच्या निवासस्थानाच्या सुरक्षेचा तसेच शहरातील पोलीस यंत्रणेच्या सज्जतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
आता या प्रकरणात पोलीस प्रशासन काय कारवाई करते आणि मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केल्यानंतर सरकार कोणती भूमिका घेते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
____








