रोहित पवारांचा फडणवीसांवर निशाणा; भाजप आक्रमक सत्यजीत तांबेंचा संयमाचा सल्ला
Mumbai : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणावर पत्रकार परिषद घेत काही गंभीर प्रश्न उपस्थित करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अप्रत्यक्षपणे बोट दाखवले. त्यांनी ‘मफलर मॅन’ असा उल्लेख करत फडणवीस यांचा छायाचित्रासह संदर्भ दिल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. यानंतर भाजप आक्रमक झाली असून भाजपने रोहित पवार यांना जोरदार उत्तर दिले आहे. दरम्यान, आमदार सत्यजीत तांबे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत रोहित पवारांना संयम बाळगण्याचा सल्ला दिला आहे.
रोहित पवार यांनी यापूर्वीही अजित पवार यांच्या विमान अपघातासंदर्भात अनेक पत्रकार परिषदा घेत विमान कंपनी, संबंधित व्यक्ती आणि या प्रकरणातील संभाव्य जबाबदाऱ्यांबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. १६ नोव्हेंबर रोजी ‘मफलर मॅन’ कोण, हे स्पष्ट करणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यानुसार पत्रकार परिषदेत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो दाखवत, व्हीएसआर कंपनी आणि व्ही. के. सिंह यांच्याशी संबंधित व्यक्तींना संरक्षण देणारी राजकीय शक्ती कोण, असा सवाल उपस्थित केला. मात्र, संबंधित छायाचित्रातील व्यक्तीच अपघातासाठी जबाबदार असल्याचा आपला दावा नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रवादी महायुतीत का आली? अमित शाहांनी पुण्यात सांगितला अजितदादांचा खास किस्सा
रोहित पवारांच्या या भूमिकेनंतर भाजपच्या नेत्यांकडून आणि प्रवक्त्यांकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जात आहे. फडणवीस यांच्यावर करण्यात आलेले आरोप निराधार असल्याची भूमिका भाजपकडून मांडली जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीतील कार्यक्रमात या विषयावर भाष्य करत अपघाताचा अहवाल लवकरात लवकर समोर यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली होती.
या राजकीय आरोप-प्रत्यारोपांमध्ये आमदार सत्यजीत तांबे यांची पोस्ट विशेष चर्चेत आली आहे. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील मैत्री, विश्वास आणि राजकीय सहकार्य आपण जवळून पाहिल्याचे सांगत त्यांनी फडणवीस यांच्याशी अपघाताचा संबंध जोडण्याच्या प्रयत्नावर नाराजी व्यक्त केली. अशा संवेदनशील घटनेचे राजकीय भांडवल करणे चुकीचे असल्याचे त्यांनी म्हटले.
रोहित पवार हे अभ्यासू आणि महत्त्वाकांक्षी तरुण आमदार असून त्यांनी प्रत्येक विषयावर तातडीने प्रतिक्रिया देण्याऐवजी संयम, अभ्यास आणि राजकीय परिपक्वतेला प्राधान्य द्यावे, असा सल्लाही तांबे यांनी दिला. दरम्यान, अजित पवारांच्या विमान अपघातामागील नेमके कारण काय, याबाबत अधिकृत अहवालातून स्पष्टता येणे महत्त्वाचे आहे. आरोप- प्रत्यारोपांच्या राजकीय वातावरणात तपासाचे निष्कर्ष आणि ठोस पुरावे यांनाच निर्णायक महत्त्व राहणार असून, आगामी काळात या प्रकरणावरून महाराष्ट्राच्या राजकारणातील संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.








