व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण उदय सामंतांचा भाजपला नाव न घेता इशारा, महायुतीतील वाद पुन्हा चव्हाट्यावर!

उदय सामंतांचा भाजपला नाव न घेता इशारा, महायुतीतील वाद पुन्हा चव्हाट्यावर!

 

दादागिरीच्या जोरावर मतदारसंघात काम करता येईल, असे समजू नका’; कार्यकर्त्यांना डावलल्याच्या तक्रारींच्वर सूचक विधान

Mumbai : राज्यात महायुतीमधील भाजप आणि शिवसेना या दोन प्रमुख पक्षांच्या नेत्यांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेली धुसफूस पुन्हा चर्चेत आली आहे. विधानपरिषद निवडणुकांपासून दोन्ही पक्षांतील मतभेद वेळोवेळी समोर आले असून, आता रत्नागिरीतील स्थानिक राजकीय घडामोडींवरून शिवसेनेचे नेते तथा मंत्री उदय सामंत यांनी भाजपला नाव न घेता थेट इशारा दिला आहे. ‘मी पायाने बांधलेली गाठ हाताने सुटणार नाही,’ या त्यांच्या विधानामुळे रत्नागिरी जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

सध्या निवडणुकांचा किंवा राजकारणाचा मोसम नसला, तरी केवळ दादागिरीच्या जोरावर मतदारसंघात काम करता येईल, असा समज कोणी करून घेऊ नये. अशा प्रकारांना आपण घाबरत नसल्याचे सांगत सामंत यांनी आपल्या शैलीत विरोधकांना सुनावले. त्यांच्या या वक्तव्याचा रोख भाजपच्या स्थानिक नेत्यांकडे असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

शिवसेनेचे पंचायत समिती सदस्य विनोद झगडे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना उदय सामंत यांनी हे विधान केले. महायुतीमध्ये दोन्ही पक्ष एकत्र असले, तरी स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांमध्ये समन्वयाचा अभाव आणि वर्चस्वाच्या संघर्षातून मतभेद निर्माण होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे सामंत यांच्या वक्तव्याला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.

मतदार यादीतून पात्र नागरिकांची नावे वगळली जाणार नाहीत याची दक्षता घ्या; काँग्रेसचे स्पष्ट निर्देश

 

दरम्यान, रत्नागिरीचे भाजप जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांच्याकडून स्थानिक शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना डावलले जात असल्याचा तसेच त्यांना त्रास दिला जात असल्याचा आरोप शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर उदय सामंत यांनी कोणाचेही नाव न घेता भाजपच्या स्थानिक नेतृत्वाला लक्ष्य केल्याचे बोलले जात आहे.

महसूलमंत्री बावनकुळे आणि अनंतराव देशमुखांमध्ये स्नेहमिलन भेट राजकीय चर्चांना उधाण!

 

यापूर्वी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या ५०० कोटी रुपयांच्या कथित व्हिडिओ क्लिपवरूनही भाजप आणि शिवसेनेतील अंतर्गत मतभेद उघड झाले होते. त्यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री उदय सामंत यांनी पक्षातील नेते व कार्यकर्त्यांना संयम राखण्याचे आवाहन करत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला होता.

मात्र, आता रत्नागिरीतील स्थानिक राजकीय संघर्षामुळे महायुतीतील अंतर्गत धुसफूस पुन्हा समोर आली आहे. राज्यात सत्तेत एकत्र असलेल्या पक्षांमध्ये जिल्हास्तरावरच संघर्षाची ठिणगी पडत असल्याने आगामी काळात या वादाचे पडसाद काय उमटतात, याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.

 

_____

 

error: Content is protected !!