सदिच्छा भेट पण ; निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भेटीचे राजकीय अर्थ लावण्यास सुरुवात
Washim : दिवाळीच्या स्नेहमेळाव्यांच्या निमित्ताने राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी वाढत असतानाच राज्याचे महसूल मंत्री आणि भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माजी खासदार अनंतराव देशमुख यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान देशमुख कुटुंबीयांसोबत त्यांनी स्नेहभोजनाचाही आस्वाद घेतला. वरकरणी ही भेट दिवाळीच्या शुभेच्छा आणि सदिच्छांपुरती मर्यादित असली, तरी राजकीय वर्तुळात मात्र या भेटीची चर्चा रंगू लागली आहे.
चंद्रशेखर बावनकुळे हे भाजपमधील महत्त्वाचे नेते असून, राज्य सरकारमध्ये महसूल मंत्रिपदाची जबाबदारी सांभाळत आहेत. दुसरीकडे, माजी खासदार अनंतराव देशमुख यांचेही राजकीय वर्तुळात महत्त्वाचे स्थान आहे. त्यामुळे या दोन्ही नेत्यांची झालेली भेट केवळ कौटुंबिक स्नेहापुरती होती की त्यामागे काही राजकीय संदर्भही आहेत, याबाबत तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत.
शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत, पालकमंत्री मात्र आढावा बैठकीत व्यस्त; वाशिममध्ये राजकीय चर्चेला उधाण
विशेष म्हणजे, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी अनंतराव देशमुख यांचे वाढते संबंध आणि पक्षातील त्यांचे स्थान यावरूनही राजकीय चर्चांना चालना मिळाली आहे. बावनकुळे यांच्यासारख्या वरिष्ठ नेत्याने देशमुख यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतल्याने या भेटीकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष वेधले गेले आहे.
हिवाळी अधिवेशन केवळ दोन आठवड्यांचेच; कालावधीवरून विजय वडेट्टीवार संतप्त
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय समीकरणांची जुळवाजुळव सुरू असताना अशा भेटींना विशेष महत्त्व प्राप्त होते. त्यामुळे या स्नेहभोजनाच्या निमित्ताने भविष्यातील राजकीय रणनीती, स्थानिक समीकरणे किंवा पक्षांतर्गत घडामोडींवर चर्चा झाली का, असा प्रश्नही उपस्थित होत आहे.
मात्र, या भेटीत कोणत्याही राजकीय विषयावर चर्चा झाल्याची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे ही भेट दिवाळीच्या शुभेच्छा, गप्पा आणि स्नेहभोजनापुरतीच होती की त्यातून एखाद्या नव्या राजकीय समीकरणाची नांदी होणार आहे, हे आगामी काळात स्पष्ट होईल. सध्या तरी बावनकुळे-देशमुख भेटीने राजकीय वर्तुळात चर्चेला चांगलीच फोडणी दिली आहे.
____








