मायक्रो फायनान्स कंपन्यांवर रविकांत तुपकरांचा संताप
Akola राज्यातील दुष्काळी परिस्थिती, पीक विम्याची रखडलेली रक्कम आणि मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून होणाऱ्या जाचक कर्जवसुलीच्या विरोधात शेतकरी नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी बुलढाणा जिल्ह्यात ‘दुष्काळ संघर्ष यात्रा’ सुरू केली असून, यात्रेच्या पाचव्या दिवशी बँका आणि मायक्रो फायनान्स कंपन्यांना लक्ष्य केले. दुसरीकडे, लातूर जिल्ह्यात कर्जवसुलीच्या नावाखाली महिला एजंटकडून शेतकरी नेत्याला शिवीगाळ केल्याची ध्वनिफीत व्हायरल झाली आहे. तर अकोल्याचे आमदार नितीन देशमुख यांनी पीक विमा आणि दिवाळीच्या पाच हजार रुपयांच्या मदतीसाठी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
‘एक वर्ष तुम्हीही तोटा सहन करा’; तुपकरांचा सवाल
बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील सोनगाव येथे आयोजित सभेत रविकांत तुपकर यांनी बँका आणि मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या कर्जवसुलीच्या धोरणावर सडकून टीका केली. शेतकऱ्यांच्या माध्यमातून या कंपन्यांनी वर्षानुवर्षे हजारो कोटींचा नफा कमावला. मात्र, एक वर्ष दुष्काळ पडल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला असताना त्यांना दिलासा देण्याऐवजी कर्जवसुलीसाठी तगादा लावला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
दिवाळी अंधारात; ८२ हजार शेतकऱ्यांना भाजप सरकारने दाखविला ठेंगा!
‘शेतकऱ्यांच्या जीवावर वर्षानुवर्षे हजारो कोटी रुपये कमावले. आता एक वर्ष दुष्काळ पडला आणि शेतकरी संकटात सापडला, तर तुम्हीही थोडा तोटा सहन करा ना! एक वर्ष नफा मिळाला नाही, तर तुमच्या कंपन्या बंद पडतील का? दुष्काळ सहन करण्याचा ठेका फक्त शेतकऱ्यांनीच घेतला आहे का?’ असा संतप्त सवाल तुपकर यांनी उपस्थित केला.
बुलढाण्यात मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांनी काढलेल्या मोर्चावरही त्यांनी टीका केली. अप्रत्यक्ष टीका करणाऱ्यांना आपण घाबरत नसल्याचे सांगत, अंगावर आल्यास जशास तसे उत्तर देण्याचा इशारा त्यांनी दिला. दुष्काळाची परिस्थिती निर्माण होणार असल्याची पूर्वकल्पना सरकारला असतानाही शेतकऱ्यांना आत्महत्येच्या उंबरठ्यावर का आणले, असा सवाल त्यांनी केला. शेतकरी आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सरकारविरोधात संघर्ष सुरूच ठेवणार असल्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
कर्जवसुलीच्या नावाखाली दादागिरी; महिला एजंटची शिवीगाळ व्हायरल
लातूर जिल्ह्यातील खलंग्री येथे मायक्रो फायनान्स कंपनीच्या कर्जवसुली प्रतिनिधींकडून नागरिकांना त्रास दिला जात असल्याचा आरोप समोर आला आहे. खलंग्री येथील सतीश बोळंगे यांनी ‘क्रेडिट बी’ फायनान्स कंपनीकडून कर्ज घेतले होते. कर्जाची वेळेत परतफेड न झाल्याने कंपनीच्या प्रतिनिधींनी कर्जदारासह गावातील ५० ते ७० नागरिकांना फोन करून दबाव टाकल्याचा आरोप आहे.
मोर्शीच्या मुख्याधिकाऱ्यांच्या निलंबनाची शिफारस; विभागीय चौकशीचेही आदेश
शेतकरी नेत्याला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ
या प्रकरणात कंपनीच्या महिला वसुली एजंटने शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गजानन बोळंगे यांना फोन करून अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. या संभाषणाची ध्वनिफीत समाजमाध्यमांवर व्हायरल झाली आहे. कर्जवसुलीच्या नावाखाली नागरिकांना अपमानास्पद वागणूक देऊन मानसिक त्रास देणाऱ्या कंपनीवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
पीक विमा आणि पाच हजारांच्या मदतीसाठी नितीन देशमुख आक्रमक
हेक्टरी एक लाख रुपयांच्या मदतीसाठी समृद्धी महामार्गावर आंदोलन केल्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार नितीन देशमुख यांनी पुन्हा शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आंदोलनाची भूमिका घेतली आहे. सोयाबीन उत्पादकांना पीक विम्याची रक्कम तातडीने मिळावी, तसेच तूर पिकाची पाहणी करून तूर उत्पादकांनाही विम्याचा लाभ द्यावा, अशी त्यांची मागणी आहे.
स्व. गोवर्धन शर्मांवर टीका करण्याचा अधिकार नितीन देशमुखांना कोणी दिला? वैशाली शेळकेंचा सवाल
विदर्भात आंदोलनाचा इशारा
या मागण्यांसाठी पहिल्या टप्प्यात विदर्भातील सर्व उपविभागीय अधिकारी कार्यालयांवर मोर्चे काढण्यात येणार आहेत. त्यानंतर संपूर्ण विदर्भात व्यापक आंदोलन उभारण्याचा इशारा देशमुख यांनी दिला आहे.
राज्य सरकारने दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना पाच हजार रुपयांची अग्रीम मदत जाहीर केली होती. मात्र, अकोला जिल्ह्यातील तब्बल ८२ हजार शेतकरी अद्याप या मदतीपासून वंचित असल्याचा दावा नितीन देशमुख यांनी केला आहे. या शेतकऱ्यांना मदत तातडीने वितरित करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.








